मुंबईः महाराष्ट्र महसूल विभागाने राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा-२०२३ चा अंतिम निकाल जाहीर केला असून या परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, असे उमेदवार महसूल विभागाच्या www.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
महसूल विभागाने यापूर्वी ५ जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. आता या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने राज्याच्या ३६ जिल्ह्यांत ५७ शिफ्टमध्ये तलाठी भरती परीक्षा घेतली होती.
या परीक्षेसाठी एकूण १ लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ८६ हजार ४०० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे हे प्रमाण ८३.०३ टक्के एवढे आहे.
कशी पहायची निवड यादी?
ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल आणि निवड यादी अशी पाहता येईल.
- www.mahabhumi.gov.in या महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर ‘तलाठी थेट सेवा भरती-२०२३ ‘निवड यादी आणि प्रतीक्षा यादी’ या ऑप्शनवर क्लिक करा.
- या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज दिले. तुम्ही जेथून परीक्षेसाठी अर्ज केला होता तो प्रदेश निवडा.
- तुमचा प्रदेश निवडल्यानंतर तलाठी थेट सेवा भरती-२०२३ च्या निकालाची पीडीएफ तुमच्या स्क्रीनवर येईल.
- या पीडीएफ यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर टाकून तपासा.
- तुमचे नाव आल्यानंतर फाईल डाऊनलोड करा आणि निकालाची प्रिंटआऊट काढून घ्या.
महसूल विभागाने मुंबई आणि नागपूर विभागाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली आहे. या दोन विभागाच्या निवड यादीसाठी स्वतंत्र लिंक्सही दिल्या आहेत. हे दोन विभाग वगळता इतर सर्व प्रदेशांचा निकाल मात्र एकाच लिंकवर दिला आहे. मुंबई व नागपूर वगळता इतर प्रदेशातील उमेदवार https://mahabhumi.gov.in.Mahabhumilink/LogIn/SelectionList या लिंकवर त्यांचे निकाल पाहू शकतात.