मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणामुळे बारावीच्या सराव परीक्षेचा बट्ट्याबोळ, बोर्ड परीक्षेच्या तोंडावरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकार प्रचंड दबावाखाली आले असून या आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सुरू केलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणामुळे मात्र छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीच्या सराव परीक्षेचा बट्ट्याबोळ झाला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारून या सर्वेक्षणासाठी शिक्षकांना जुंपण्यात आल्यामुळे २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सराव परीक्षाच पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे ऐन मुख्य परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन वर्षे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले होते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन सरावाचा प्रचंड अभाव निर्माण झाला होता. या काळात परीक्षा घेणे व मूल्यमापन करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या.

या सर्वांचा एकंदर परिणाम गेल्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय मोडण्यात झाला. परिणामी विद्यार्थ्यांना तीन तासांच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहिण्यासाठी वेळ अपुरा पडणे, परीक्षेची भीती वाटणे आणि आत्मविश्वासाचा कमरता जाणवणे या बाबी शिक्षकांच्या निदर्शनास आल्या. त्यावर तोडगा म्हणून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून  इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सराव समृद्धी उपक्रमां’तर्गत सरावर परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन कौशल्य अचूक व गतीने प्राप्त करणे हा या सराव परीक्षेचा मुख्य हेतू आहे.

 पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सराव परीक्षा २२ जानेवारी ते २९ जानेवारी २०२४ या काळात निश्चित करण्यात आली होती. परंतु ही परीक्षा सुरू होण्याच्या आधीच मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करावयाच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या सेवा अधिगृहित करण्यात आल्या.

या सर्वेक्षणासाठी प्रगणक म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांना नोडल अधिकाऱ्यांमार्फत वैयक्तिक आदेश तालीम करण्यात आले आणि या सर्वेक्षणाच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली. त्यामुळे इयत्ता बारावीची पूर्वनियोजित सराव परीक्षा घ्यायचे सोडून हे शिक्षक मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लागले. २३ ते ३१ जानेवारी असे सात दिवस हे शिक्षक या सर्वेक्षणातच व्यस्त असणार आहेत.

अनेक कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांतील बहुतांश शिक्षकांना या सर्वेक्षणाचे काम देण्यात आल्यामुळे बहुतांश महाविद्यालयात २२ जानेवारीपासून ही सराव परीक्षाच होऊ शकली नाही. काही ठिकाणी तुटपुंज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही सराव परीक्षा थातूरमातूर पद्धतीने गुंडाळण्यात आली.

आता सराव परीक्षा होणे अशक्य?

मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणामुळे इयत्ता बारावीची सराव परीक्षा निर्धारित वेळेत घेऊ शकत नसल्याचे अनेक कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांनी माध्यमिक शिक्षण विभागाला कळवल्यानंतर त्यांना ही परीक्षा स्थगीत करून पुन्हा सोयीनुसार घेण्याची संधी देण्यात आली खरी, परंतु येत्या २ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर २१ फेब्रुवारीपासून मुख्य परीक्षेला सुरूवात होणार आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेनंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी उजळणी करण्यातच व्यस्त होणार असल्यामुळे आता ही सराव परीक्षा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची आणि या सराव परीक्षेचा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत फारसा फायदा होण्याची शक्यताही कमीच आहे.

…तर मिळणार नाही अंतर्गत गुण

इयत्ता बारावीची ही सराव परीक्षा अंतर्गत गुणांशी जोडण्यात आली आहे. जे विद्यार्थी सराव परीक्षा देणार नाहीत त्यांना अंतर्गत गुणांना मुकावे लागणार आहे. अंतर्गत गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढण्यासाठी मोठी मदत होते. परंतु मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणामुळे ही नियोजित सराव परीक्षाच देता न आल्यामुळे आणि आता पुढील परीक्षांचे नियोजन पाहता ही परीक्षा घेतली जाण्याची शक्यताही कमीच असल्यामुळे इयत्ता बारावीचे विद्यार्थी अंतर्गत गुणांना मुकणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!