
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उपवासाला फराळ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अन्नविषबाधा होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर विक्री करतांना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळवले आहे.
भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परगिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेली अशी भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.
अशी घ्या काळजी
- बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकिटे व सुटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटवरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
- भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा.जेणकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
- शक्यतो भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
- भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.
- भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे.
विक्रेत्यांनी काय करावे?
विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी तथापि भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करुन घ्यावी. मुदबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.
दुकानांची होणार तपासणी
भेसळयुक्त भगर विक्री टाळण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे वतीने भगरविक्री करणाऱ्या दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळयुक्त, बुरशीयुक्त भगर विक्री करणाऱ्या वा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिला आहे.
