
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील भूगोलाचे प्राध्यापक डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी ‘मी नवप्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष असून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सुरू होणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये मी तुमची प्राध्यापकपदी नेमणूक करून देतो,’ असे आमिष दाखवून भूलथापा मारत तासिका तत्वावर काम करणाऱ्या अनेक उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले असून त्यांच्याविरुद्ध उच्च शिक्षण मंत्रालयाची फसवणूक तसेच गैरमार्गाने अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रा. संदीप आर. पाथ्रीकर हा नवप्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून विविध अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांत तासिका तत्वावर काम करणाऱ्या अनेक उमेदवारांकडून त्यांनी सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले आहेत. प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकरांनी राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच विद्यापीठांतील विविध विभागात सहायक प्राध्यापकांची भरती सुरू होणार आहे. मी तुमची नियुक्ती करून देतो, पण त्यासाठी मला पैसे द्यावे लागतील, अशी थाप मारून तासिका तत्वावर काम करणाऱ्या अनेक उमेदवारांना लुबाडले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सहसंचालकांनीच दिली होती फिर्याद
प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर यांचे हे उद्योग काही आताचे नाहीत. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १६ जुलै २०२३ रोजी पुण्याचे तत्कालीन विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी पुण्याच्या बंड गार्डन पोलिस ठाण्यात प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकरांच्या विरोधात फिर्याद दिली होती. नवप्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष संदीप पाथ्रीकर यांच्याकडून सहायक प्राध्यापक पदभरती प्रक्रियेत अडथळा निर्माण करून स्वतःच्या ओळखीच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे या फिर्यादीत म्हटले होते.
२०२३ मध्ये राज्य सरकारने अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकपदांच्या भरतीस मान्यता दिल्यानंतर ही पदभरती सुरू असताना संदीप पाथ्रीकरांनी थेट पुण्याच्या विभागीय सहसंचालकांवरच दबाब टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही फिर्याद देण्यात आली होती.
अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेच्या ५ अनुदानित महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक भरतीसाठी देण्यात आलेल्या जाहितीनुसार ७,८ व ९ जुलै २०२३ रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखती सुरू असतानाच संदीप पाथ्रीकराने ९ जुलै रोजी पुण्याचे तत्कालीन विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांना व्हॉट्सअप कॉल केला होता. परंतु बोंदर हे मुलाखतीच्या पॅनेलमध्ये असल्यामुळे त्यांनी हा कॉल घेतला नव्हता.
डॉ. बोंदर यांनी १० जुलै रोजी पाथ्रीकर यांच्या मोबाइलवर कॉलबॅक केला असता सदर इसमाने नवप्राध्यापक संघटना, औरंगाबाद या संघटनेत कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्याची या पदभरतीमध्ये निवड करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या पदभरतीत शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्र देवळाणकर व सहसंचालक (मुख्यालय) डॉ. प्रकाश बच्छाव हे उच्च शिक्षण मंत्र्यांचे नाव वापरून त्यांचे उमेदवार भरती करण्यासाठी दबाव टाकत असून तुम्ही माझ्या राज्यशास्त्र विषयाच्या उमेदवाराची या संस्थेत निवड करा, अन्यथा मी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करेल, अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले होते.
यापूर्वीही माझ्या संघटनेतील तसेच माझ्या परिचयातील बऱ्याच उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व नांदेड विभागातील महाविद्यालयांमध्ये नोकरीला लावले असून तुम्ही देखील त्यांच्याप्रमाणे कार्यवाही करून सदरहू राज्यशास्त्राच्या उमेदवाराची निवड करा, असे म्हणून दबाव टाकला. संदीप पाथ्रीकर एवढ्यावर थांबले नाहीत तर १० जुलै २०२३ रोजी त्यांनी थेट उच्च शिक्षण संचालक कार्यालयात जाऊन माझे दोन उमेदवार अहमदनगर येथे लावल्यास माझी काहीही तक्रार असणार नाही, असे सांगितल्याचे या फिर्यादीत म्हटले होते.
महाविद्यालयाकडूनही पाठराखण?
संदीप पाथ्रीकर हे संघटनेच्या नावाखाली महाविद्यालयातील त्यांची कर्तव्ये पार पाडत नाहीत. ते सतत गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्या भूगोल विषयाच्या तासिका व प्रात्यक्षिके होत नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय होत आहे. दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे संस्थाचालक व प्राचार्य हे प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर यांना पाठीशी घालत आहेत, असे याही या तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या काळात भरारी पथकात नेमणूक असतानाही संदीप पाथ्रीकरांनी बऱ्याचशा महाविद्यालयांना भेटी न देताच भरारी पथकाला देय असलेला प्रवासभत्ता व दैनंदिन खर्चाच्या रकमा उकळल्या आहेत. त्यामुळे प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकरांनी उच्च शिक्षण मंत्रालयाची फसवणूक आणि गैरमार्गाचा अवलंब करून अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्र्यांसह विविध प्राधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

