छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधीच आपल्या शागीर्दांची महत्वाच्या हुद्द्यांवर वर्णी लावली आहे. डॉ. येवले यांच्या गळ्यातील ताईत बनलेले मावळते अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, येवलेंची ‘सावली’ बनून हुकुमाची ताबेदारी कुलसचिवपद सांभाळलेले डॉ. भगवान साखळे यांच्यासह डॉ. कैलास अंभुरे आणि आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांची महत्वाच्या हुद्द्यावर वर्णी लावण्यात आली आहे. डॉ. भास्कर साठे यांनाही ‘बक्षिसी’ देण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी त्यांचा कार्यकाळ बहुतांश महत्वाच्या पदांवर प्रभारी अधिकारी नेमूनच निभावून नेला आहे. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कुलसचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रसायन तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी कुलसचिवदी नेमणूक करण्यात आली.
वर्षभर साखळे यांनी कुलसचिवपदाचा प्रभार सांभाळला. परंतु कुलगुरू डॉ. येवले जाण्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिला आणि ते रसायन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख बनले. गेले वर्षभर डॉ. साखळे यांनी कुलगुरूंच्या हुकुमाची प्रामाणिकपणे ताबेदारी केली, त्याची बक्षिसी म्हणून कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. साखळे यांची विभागप्रमुख गटातून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी आज नियुक्ती केली.
डॉ. साखळे यांच्या राजीम्यामुळे कुलसचिवपद रिक्त झाल्यामुळे आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार सोपवण्यात आला आहे. डॉ. येवले यांच्या कार्यकाळात भरड यांनी दाखवलेल्या कर्तव्यपरायणतेची ही ‘बक्षिसी’ मानली जाते.
कुलगुरू डॉ. येवले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि ‘गळ्यातील ताईत’ बनून सेवा केलेले विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांचा अधिष्ठाता म्हणून कार्यकाळ डॉ. येवले यांच्याबरोबरच संपुष्टात येणार आहे. अधिष्ठाता म्हणून काम करताना डॉ. येवले यांच्या प्रत्येक ‘कामकाजा’त त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
चार अधिष्ठांतापैकी फक्त डॉ. वायकर हेच कुलगुरू डॉ. येवले यांच्या अत्यंत जवळचे होते आणि त्यांनीही ईमाने-ईतबारे डॉ. येवले यांच्या हुकुमाची ताबेदारी केली. त्यामुळे जाता जाता डॉ. येवले यांनी डॉ. भालचंद्र वायकर यांची अटल इन्कुबेशन सेंटरच्या संचालकपदी आज वर्णी लावली. ही वर्णी लागली नसती तर त्यांना प्राणीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून शिकवत बसावे लागले असते.
इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. मुस्तजीब खान यांच्याकडे विद्यार्थी विकास संचालकपदाचा प्रभार सोपवण्यात आला होता. डॉ. येवले यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि ते इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून स्थानापन्न झाले.
डॉ. मुस्तजीब खान यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकपदी मराठी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. कैलास अंभुरे यांची वर्णी लावण्यात आली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. भारती गवळी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु कुलगुरू डॉ. येवले यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांना पुढील काहीकाळ तरी हा प्रभार सांभाळावा लागणार आहे.
ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. वीणा हुंबे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्यामुळे त्यांच्या पदावर विधी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. नंदिता पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक व अधिसभा सदस्य डॉ. भास्कर साठे यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या संचालकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
डॉ. येवले यांनी नुकतीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत डॉ. येवले यांनी विद्यापीठातील प्राध्यापक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि विद्यार्थी संघटना जातीयवादी आणि भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधी डॉ. येवले यांनी केलेल्या नियुक्त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काही पदांवर प्रभारी नियुक्त्या करताना सेवाज्येष्ठतेचा निकष पाळावा लागतो, तो पाळला गेला नसल्याचा आरोप होत आहे.