औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर निर्वाचक गणाच्या आरक्षित प्रवर्गातील पाच जागांवर महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. या पाच प्रवर्गाच्या निवडणुकीत भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांना सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गणातील अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. पदवीधर गणातील दहा जागांपैकी आरक्षित प्रवर्गातील पाच जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी पाचही आरक्षित प्रवर्गातून बाजी मारली आहे. सुनिल मगरे (अनुसूचित जाती), सुनिल निकम (अनुसूचित जमाती), सुभाष राऊत (ओबीसी), दत्तात्रय भांगे (एनटी) आणि पूनम पाटील (महिला राखीव) हे उत्कर्ष पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्त्वात उत्कर्ष पॅनलने ही निवडणूक लढवली. त्यामुळे विद्यापीठाच्या राजकारणात आ. चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे.
उत्कर्ष पॅनलचे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार सुनिल मगरे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच निर्णायक आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासूनच त्यांना मिळालेली मते आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते यात मोठी तफावत असल्याने मगरे यांचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत होता. एकूण झालेल्या १८ हजार ४०० मतांपैकी १४ हजार ३२८ मते अनुसूचित जाती प्रवर्गात वैध ठरली होती. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ७ हजार १७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सुनिल मगरे यांनी निर्धारित कोट्यापेक्षा जास्त म्हणजेच ८ हजार ९३६ मते मिळवून विजय संपादन केला आहे. या प्रवर्गातील ४ हजार ११ मते अवैध ठरली आहेत. त्यांचे नजीकचेे प्रतिस्पर्धी छाया खाजेकर यांना २ हजार ६५ मते मिळाली.
कोणाला मिळाली किती मते?
महिला राखीव प्रवर्गः या प्रवर्गात १३ हजार ८८५ मते वैध ठरली. त्यापैकी उत्कर्ष पॅनलच्या पूनम कैलास पाटील यांना ८ हजार ८ मते मिळाली आणि त्या विजयी ठरल्या. त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी ज्योती आसाराम तुपे यांना २ हजार ९०८ मते मिळाली.
भटके विमुक्त जाती-जमाती(व्हीजेएनटी): या प्रवर्गात १३ हजार ४५१ मते वैध ठरली. त्यापैकी ७ हजार २२६ मते मिळवून उत्कर्ष पॅनलचे दत्तात्रय सुंदरराव भांगे हे विजयी झाले आहेत. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी चंद्रकांत फड यांना २ हजार ४८९ मते मिळाली.
अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग): या प्रवर्गात १४ हजार २२८ मते वैध ठरली. त्यापैकी ८ हजार ५१ मते मिळवून उत्कर्ष पॅनलचे सुनिल पुंडलिकराव निकम हे विजयी झाले. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी महम्मद अझरूद्दीन यांना ३ हजार ३३० मते मिळाली.
इतर मागास प्रवर्ग(ओबीसी): या प्रवर्गात १३ हजार ८४२ मते वैध ठरली. त्यापैकी ९ हजार ४३३ मते मिळवून उत्कर्ष पॅनलचे सुभाष किसनराव राऊत हे विजयी झाले आहेत. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी संदीप दत्तात्रय जाधव यांना १ हजार ९५४ मते मिळाली.