नियमांची ऐशीतैशीः परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी खैरनारांचा एलएलबीबरोबरच पीएच.डी.लाही प्रवेश!


औरंगाबादः ज्यांच्यावर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी आहे, तेच अधिकारी स्वतःच नियम पायदळी तुडवून ‘सेवाशर्थी’ नियमांचे उल्लंघन करत असल्याचा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडत आहे.  विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानी न घेताच डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजध्ये एलएलबीला प्रवेश घेणारे आणि ७५ टक्के हजेरीचा नियम पायदळी तुडवून एक दिवसाचीही हजेरी नसताना परीक्षा देणारे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी व्यंकटराव साहेबराव खैरनार यांचा आणखी एक प्रताप न्यूजटाऊनच्या हाती आला आहे. विद्यापीठातील हा बहाद्दर अधिकारी नियमबाह्यपणे एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याचे पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यंकटराव साहेबराव खैरनार हे कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या सेवेत ते कायमस्वरुपी आणि पूर्णवेळ कर्मचारी आहेत. एखाद्या शासकीय, निमशासकीय किंवा स्वायत्त आस्थापनेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्याला जर नोकरी करत करत शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर त्याला संबंधित प्रशासनाकडून पूर्वपरवानगी आणि नाहरकत प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य आहे.

आवश्य वाचाः डॉ. गणेश मंझांची फसवेगिरीः ‘लायकी’ ३९ हजारांची, पण उचलतात दरमहा अडीच लाख रुपये पगार; आता खाल्लेले ओकण्याची पाळी!

 परंतु खैरनार यांनी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र न घेताच डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सध्या ते एलएलबीच्या द्वितीय वर्षाला आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसू देण्यासाठी किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचा विद्यापीठाचाच नियम असताना खैरनार यांनी तिन्ही सत्रांना एक दिवसाचीही हजेरी नसताना परीक्षा दिल्या आणि विद्यापीठाने त्यांचा निकालही जाहीर केला.

विद्यापीठाचे नियम,परिनियम पायदळी तुडवून एलएलबी हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत असलेले खैरनार यांची सामान्य प्रशासन विषयात पीएच.डी.ही सुरू आहे. खैरनार यांनी २०१८ मध्ये सामान्य प्रशासन विषयात पीएच.डी. साठी २०१८ मध्ये पेट परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यांचा नोंदणी क्रमांक १४२२८ आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून पेट परीक्षा दिलेल्या खैरनारांनी या परीक्षेत ७० गुण मिळवले. त्यानंतर विद्यापीठाच्या विद्यावाचस्पती विभागाने दिनांक २६ मार्च २०१९ रोजी त्यांच्या पीएच.डी. साठीच्या नोंदणीला मंजुरी दिली. त्या मंजुरी पत्राचा क्रमांक Ref.No./Ph.D./2018-19/16361-63  असा आहे.

सामान्य प्रशासन विभागातील पीएच.डी.चे मार्गदर्शक डॉ. एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शाखाली साहेबराव खैरनार हे ‘महाराष्ट्रातील विद्यापीठ कायद्यांची अंमलबजावणी एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. साठी संशोधन करत आहेत. विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेताच डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबीला प्रवेश घेणारे आणि ७५ टक्के हजेरीचा नियम असतानाही एक दिवसाची हजेरी नसताना परीक्षा देऊन पदवी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात असलेले खैरनार यांनी पीएच.डी.साठी नोंदणी करण्यापूर्वी आणि प्रवेश घेण्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतली होती का? हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

एकीकडे खैरनार हे एलएलबी हा व्यावसायिक अभ्यासक्रम करत आहेत तर दुसरीकडे ते उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी असलेल्या पीएच.डी.साठी संशोधनही करत आहेत आणि विद्यापीठात कक्ष अधिकारी म्हणून पूर्णवेळ सेवाही देत आहेत. अशा स्थितीत एकाचवेळी एवढा सगळा उपद्व्याप करण्यासाठी त्यांना वेळ कसा मिळतो? की विद्यापीठात बसूनच ते या दोन्ही अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी वेळ देऊन विद्यापीठ सेवेतील मूळ कर्तव्यात कसूर करत आहेत? याचा शोध आता विद्यापीठ प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी व्यंकटराव साहेबराव खैरनार यांचे पीएच.डी.साठी संशोधन सुरू आहे, त्याचा हा पुरावा.

खैरनारांविरुद्ध कुलसचिव कारवाई करणार का?

 विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी साहेबराव खैरनार यांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र न मिळवताच एलएलबीला प्रवेश घेतल्याचे आणि ७५ टक्के  उपस्थितीचा नियम पायदळी तुडवून परीक्षा दिल्याचे वृत्त न्यूजटाऊनने प्रसिद्ध केल्यानंतर विद्यापीठात अशा पद्धतीने नियमभंग करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात ऐकायला मिळाली आहे. ‘सगळेच असे करतात’ असा त्या चर्चेचा सूर आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून प्रवेश घेणारे विद्यापीठातील अधिकारी/कर्मचारी किती? त्याची कुलसचिव चौकशी करणार का? आणि बेकायदेशीरपणे एलएलबीला प्रवेश आणि नियमभंग करून परीक्षा देणारे खैरनार यांची कुलसचिव खातेनिहाय चौकशी लावून शिस्तभंगाची कारवाई का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!