विनाअनुदानित महाविद्यालयांचे चांगभलं: पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागात प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ. येवले यांच्या या निर्णयामुळे कायमस्वरुपी विनाअनुदानित महाविद्यालयांचे चांगलभलं होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. मुख्य परिसरातील मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखेतील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीच्या माध्यमातून  प्रवेश देण्यात आले.

तिन्ही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर ‘फर्स्ट कम फर्स्ट अ‍ॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. या आधी प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत आणि आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये निर्धारित केलेल्या सर्व पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याच्या अटीवर ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्वसंबंधित महाविद्यालयांनी पात्रता आवदेनपत्र विहित शुल्कासह १० सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यापुढे प्रवेशासंबंधी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!