छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील कॉपीचे प्रकरण गाजत असतानाच या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून विद्यापीठ प्रशासनाने भरारी पथके स्थापन करून ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, ती भरारी पथकेच त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन भराऱ्या घेत असल्याचे आणि विद्यार्थींनीची स्वतःच अंगझडती घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पहिल्या दिवसापासूनच या ना त्या कारणाने गाजत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून केलेले नियोजन कोलमडून पडले असून या परीक्षेतील गोंधळाचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठ प्रशासनाने नेमलेली भरारी पथकेच भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत बुडालेली असल्याचेही यानिमित्ताने समोर येऊ लागले आहे. असा एक प्रकार देवळाई परिसरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उघडकीस आला आहे.
२१ मार्चपासून या पदवीच्या उन्हाळी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने या परीक्षेसाठी भरारी पथके नेमून त्यांची कार्यक्षेत्रेही निश्चित केली आहेत. यापैकी एका भरारी पथकात वाळूजच्या दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रा. भरतसिंग सलामपुरे आणि याच महाविद्यालयात ग्रथंपाल असलेले भगवान डोके यांचाही समावेश आहे.
निलेश देगावकर अध्यक्ष असलेल्या या भरारी पथकाला पाचोड, आडूळ, सातारा (खंडोबा), बाळापूर, करमाड आणि शेंद्रा परिरातील परीक्षा केंद्रांचे कार्यक्षेत्र निर्धारित करून देण्यात आले आहे.
परंतु भगवान डोके आणि भरतसिंग सलामपुरे या दोघांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या देवळाई परिरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दोनवेळा ‘भराऱ्या’ घेतल्या.
२१ मार्च रोजी घेतलेल्या पहिल्या ‘भरारी’त त्यांनी परीक्षा सुरळीत सुरू असल्याचा अभिप्राय केंद्रावरील अभिप्राय पुस्तिकेत नोंदवला आणि पाकिटाची मागणी केली. पाकिट मिळाले नाही म्हणून या दो महाभागांनी २३ मार्च रोजी याच परीक्षा केंद्रावर दुसरी ‘भरारी’ घेतली आणि सहा विद्यार्थ्यांवर कॉपी केस केल्या आणि या परीक्षा केंद्रावर प्रचंड कॉपी आणि नियोजनात गोंधळ असल्याचा अहवाल कुलगुरूंकडे सादर केला. त्यांच्या अहवालावरून परीक्षा व मूल्यमापन मंडळाने डॉ. नवनाथ आघाव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली.
जेव्हा या परीक्षा केंद्रासाठी नेमलेले भरारी पथक परीक्षा केंद्रावर आले तेव्हा डोके आणि सलामपुरेंनी या परीक्षा केंद्रावर घेतलेल्या भराऱ्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे महाविद्यालयाच्या लक्षात आले आणि मग या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर या डोके आणि सलामपुरेंचे बिंग फुटले.
विद्यार्थीनींची घेतली स्वतःच अंगझडती
परीक्षेदरम्यान भरारी पथकाला संशय आल्यास विद्यार्थ्यांची अंगझडती घेण्याचा अधिकार आहे. परंतु भरारी पथकात महिलेचा समावेश नसेल तर त्या परीक्षा केंद्रावरील महिला प्राध्यापक किंवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थीनींची अंगझडती घ्यावी, असा नियम आहे. परंतु डोके आणि सलामपुरे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर या नियमाला तिलांजली देत विद्यार्थीनींची स्वतःच अंगझडती घेतली आणि चाळे केले, अशी तक्रार काही विद्यार्थीनींनी महाविद्यालयाकडे लेखी स्वरुपात दिली आहे. कार्यक्षेत्राबाहेर भरारी घेऊन पाकिटाची मागणी करणाऱ्या आणि अंगझडतीच्या नावाखाली विद्यार्थीनींशी चाळे करणाऱ्या या दोघांविरुद्ध विद्यापीठ प्रशासन आता काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चुकीची कारवाई केल्याचा कबुली जबाब
डोके आणि सलामपुरे हे दोघेही कार्यक्षेत्राबाहेर जाऊन वसुली करत असल्याचे महाविद्यालयाच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा हे दोघे दुसरी भरारी घेण्यासाठी महाविद्यालयावर पोहोचले, तेव्हा महाविद्यालयाने त्यांचीच झाडाझडती घेतली. त्यामुळे कैचीत अडकलेल्या डोके आणि सलामपुरे यांनी ‘आम्ही सहा विद्यार्थ्यांविरुद्ध चुकीच्या पद्धतीने कॉपी केस केल्या आणि आमच्या पदाचा गैरवापर केला’ असा लेखी कबुली जबाबच डॉ. डोके आणि प्रा. सलामपुरे यांनी या महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे दिला आहे. आम्ही केलेले कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील, असेही या कबुली जबाबात या दोघांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही डॉक्टरेट आहेत. तरीही त्यांना धड मराठीही लिहिता येत नसल्याचे या कबुली जबाबावरून स्पष्ट झाले आहे.
भरारी पथकात ग्रंथपालाचे ‘डोके’ कसे?
या भरारी पथकातील डॉ. भगवान डोके हे वाळूजच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात ग्रंथपाल आहेत. ग्रंथपाल हे शिक्षक संवर्गातील पद असले तरी परीक्षेच्या कामाशी या पदाचा तसा संबंध कमीच येत असल्यामुळे डोके यांची नियुक्ती या भरारी पथकात कुणी आणि का केली? हाही प्रश्नच आहे.
मूळात डॉ. भगवान डोके यांच्या नियुक्तीबाबतच वाद आहे. दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाने ग्रंथपालपदाच्या रिक्त जागेसाठी जेव्हा जाहिरात दिली होती, तेव्हा डॉ. भगवान डोके हे अनिवार्य असलेली शैक्षणिक अर्हता धारण करत नव्हते. त्यामुळे त्यांची नियुक्ती नियमबाह्य आणि बोगस आहे, अशी तक्रार रिपाइंचे(आठवले) शहरजिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरू आणि उच्च शिक्षण सहसंचालकाकडे केली होती.
त्या तक्रारीची चौकशी सुरू असून डॉ. डोके यांना कॅस अंतर्गत अकॅडमिक स्तर १३ए देण्यासाठी शासन प्रतिनिधी देण्यास उच्च शिक्षण सहसंचालकांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. ज्याच्या नियुक्तीवरूनच वाद आहेत, अशा ग्रंथपाल डोकेचे ‘डोके’ भरारी पथकात घुसवून विद्यापीठाने काय साधले? हेही एक कोडेच आहे.