औरंगाबादः लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक अशोक बंडगर हा त्याची पत्नी पल्लवी, दोन मुली आणि त्याच्या पाळीव कुत्र्यासह फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अशोक बंडगरला निलंबित करण्याचे आदेश कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांना दिले आहेत. त्यानंतर बंडगरला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील अनेक नवनवीन पदर समोर येत असून कुलगुरू डॉ. येवले यांनी पीडित मुलीला धीर दिल्यामुळेच ती पोलिसांत जाऊन फिर्याद द्यायला तयार झाल्याची माहितीही समोर येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून औरंगाबादेत शिक्षणासाठी आलेल्या एका विद्यार्थीनीच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला आमिषे देत नाट्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक बंडगर याने तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केले. तिला बंडगरपासून सुटका हवी होती. परंतु बंडगर काही ऐकायला तयार नव्हता.
बंडगरचे अत्याचार आणि धमक्या वाढत गेल्यामुळे पीडित विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे तक्रार केली. विशाखा समितीने तिच्या तक्रारीवर सुनावणी घेतल्यानंतर बंडगर या नराधमाचे कारनामे विद्यापीठ प्रशासनाच्याही लक्षात आले.
अशोक बंडगरने या विद्यार्थीनीची मूळ पात्रता नसतानाही तिला अनधिकृतपणे एमपीए या नाट्यशास्त्र विभागातील अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन दिला होता. या प्रवेशासाठी तिच्या शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे बंडगरने ठेवून घेतली होती. माझी मूळ कागदपत्रे मला परत करा आणि येथून जाऊ द्या, एवढेच त्या अत्याचार पीडित विद्यार्थीनीचे म्हणणे होते. पोलिसात जाऊन फिर्याद द्यायला ती काही तयार होत नव्हती.
पीडित विद्यार्थीनी प्रचंड दहशतीखाली होती. बंडगरने तिला धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे आपले आयुष्यच उद्धवस्त होण्याची भीती पीडित विद्यार्थीनीला होती. परंतु प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पीडित विद्यार्थीनीस बोलावून विशाखा समितीसमोर तिचे समुपदेशन केले.
कुलगुरू डॉ. येवलेंनी घेतलेला पुढाकार आणि विशाखा समितीने समुपदेशन केल्यामुळे पीडित विद्यार्थीनीला धीर आला आणि लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक बंडगरविरुद्ध फिर्याद द्यायला ती तयार झाली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तिला रितसर लेखी पत्र दिले. ते पत्र घेऊन पीडित विद्यार्थीनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गेली आणि अशोक बंडगरविरुद्ध तिने बलात्काराची फिर्याद दिली.
अशोक बंडगरविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानतंर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी सकाळीच अशोक बंडगरला निलंबित करण्याचे आदेश कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांना दिले आहेत. कुलगुरूंच्या आदेशानंतर कुलसचिव डॉ. साखळे यांनी तडकाफडकी अशोक बंडगरच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
बंडगरविरोधात विशाखा समितीकडे सात ते आठ तक्रारी
अशोक बंडगरने केवळ या एकाच पीडित विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले, असे नाही तर त्याने नाट्यशास्त्र विभागात अक्षरशः उच्छाद मांडल्याचेही समोर येत आहे. अशोक बंडगरविरूद्ध विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे सात ते आठ विद्यार्थीनींनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींवर विशाखा समितीने सुनावणीही घेतली आहे. या सुनावणीत अशोक बंडगर दोषी आढळून आला आहे. त्याच्या विरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने सुरू केलेली असतानाच बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
विभागीय चौकशीनंतर बडतर्फी?
अशोक बंडगरविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तत्काळ बंडगरच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. बंडगरला निलंबित करून त्याची स्वतंत्र विभागीय चौकशी केली जाणार आहे. महिनाभराच्या कालावधीत ही वििभागीय चौकशी पूर्ण करून बंडगरच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातील सूत्रांनी दिली. याचाच अर्थ अशोक बंडगर याचा विद्यापीठातील अध्याय आता कायमचा संपुष्टात आला आहे.
फरार बंडगर गेला कुठे?
पैश्याच्या जोरावर आपण सगळेच विकत घेऊ शकतो, अशा मस्तीत असलेला अशोक बंडगर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. तो बेगमपुरा भागातील विद्युत कॉलनीत राहतो. या घरात अशोक बंडगर, त्याची पत्नी पल्लवी, दोन मुली आणि त्याचा पाळीव कुत्रा राहतात. गुन्हा दाखल होताच अशोक बंडगर या सर्वांना घेऊन फरार झाला आहे. सध्या त्याच्या घराला कुलूप आहे. तो नेमका गेला कुठे? याचा पोलिस शोध घेत आहेत.