
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर-२०२४ महिन्याच्या वेतनापोटी राज्य सरकारकडून प्राप्त झालेले वेतन अनुदान वितरित न करता ते मनमानी पद्धतीने विभागीय सहसंचालकांकडे धनादेशाद्वारे परत केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्याही रडारवर आहे. या महाविद्यालयातील गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून ही समिती उद्या मंगळवारी (११ फेब्रुवारी) महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष चौकशी करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे खुलताबाद येथे कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर-२०२४ महिन्याच्या वेतनापोटी प्राचार्यांच्या मागणीनुसार विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपये वेतन अनुदान देण्यात आले होते.
नियमाप्रमाणे राज्य शासनाकडून प्राप्त झालेले हे वेतन अनुदान जास्तीत जास्त तीन दिवसांच्या आत संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. परंतु कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी हे वेतन अनुदान वितरित न करताच १८ जानेवारी रोजी धनादेशाद्वारे ते विभागीय सहसंचालक कार्यालयाला परत पाठवले.
कोहिनूरचे हे पत्र २० जानेवारी रोजी प्राप्त झाल्यानंतर वेतन अनुदान देऊनही तब्बल २० दिवस महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले नसल्याची बाब विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्या लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. निंबाळकर यांनी २१ जानेवारी रोजी महाविद्यालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.
कोहिनूर महाविद्यालयाचे वेतन खाते हे प्राचार्य आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांच्या संयुक्त नावे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विभागीय सहसंचालकांनी शासन निर्णयांचा हवाला देत हे वेतन खाते प्राचार्यांच्याच एकल नावे करण्याचे निर्देश महाविद्यालय प्रशासन व व्यवस्थापनाला दिले.
विभागीय सहसंचालकांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान हे आमची संस्था ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे आमच्या महाविद्यालयाला प्राचार्यांच्या एकल नावे वेतन खाते ठेवण्याचा नियमच लागू होत नाही, असे सांगत अडून बसले. शेवटी विभागीय सहसंचालकांनी ६ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरोदे यांना पत्र लिहून या महाविद्यालयावर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले.
विभागीय सहसंचालकांचे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठस्तरावर हालचाली सुरू झाल्या. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कोहिनूर महाविद्यालयातील गैरव्यवस्थापनाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय सांळुके, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वीणा हुंबे आणि आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे यांचा समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांची या चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही चौकशी समिती उद्या मंगळवारी (११ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वाजता खुलताबाद येथे जाऊन कोहिनूर महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करणार आहे. या चौकशीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाच्या प्रश्नासोबतच महाविद्यालयात उपलब्ध अभ्यासक्रम, उपलब्ध असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अभ्यासक्रमांसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांची उपलब्धता यासह इतर बाबींचीही कसून चौकशी करणार आहे.
विशेष म्हणजे कोहिनूर महाविद्यालयात चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यकत्या सुविधा आणि मान्यताप्राप्त अध्यापकच नसल्यामुळे माजी कुलुगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता घटवली होती. त्यानंतर ती प्रवेश क्षमता वाढवून घेण्यात महाविद्यालय प्रशासनाला यश मिळाले होते. उद्या जात असलेली चार विद्यमान व एका माजी अधिष्ठातांची पाच सदस्यीय चौकशी समिती विद्यापीठाचे निकष आणि नियमांच्या फुटपट्टीवर महाविद्यालयाची झाडाझडती घेणार का? हे या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
