डॉ. आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल मैदानात; पॅनलमध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ उमेदवार


औरंगाबादः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल मैदानात उतरले असून या पॅनलमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उमेदवारांचा समावेश आहे. बँकिंग आणि प्रशासनातील तगडा अनुभव असलेले उमेदवार हे या पॅनलचे वैशिष्ट्ये असून काही लोकांच्या हडेलहप्पीमुळे डबघाईला आलेल्या या बँकेला नव्याने उर्जितावस्था मिळवून देण्याचा संकल्प आज पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. मेणबत्ती ही परिवर्तन पॅनलची निवडणूक निशाणी असून बँकेच्या मतदारांनी मेणबत्तीवर ठसा मारून परिवर्तनच्या उमेदरावांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहे आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हे मतदान होईल. त्या पार्श्वभूमीवर परिवर्तन पॅनलने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. विशेष म्हणजे परिवर्तन पॅनलच्या ११ उमेदवारांपैकी एक उमेदवार कोंडिराम सारूक हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता १० संचालकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे.

 भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नियम व आदेशाची पायमल्ली आणि अनियमितता यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेवर आरबीआयने चार वर्षांसाठी निर्बंध लादले. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बँकेच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र सरकार आणि सहकारी बँकिंग क्षेत्राच्या नियमकांच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे आर्थिक नुकसानीसाठी संचालक मंडळाची जबाबदारी निश्चित करून त्यांना नुकसान भरपाई करण्याचे निर्देशही दिले होते, मात्र या संचालक मंडळाने नुकसान भरपाई केलीच नाही. आता त्याच संचालक मंडळातील काही जण निवडणुकीला उभे आहेत. ज्यांच्यामुळे बँक डबघाईला आली, त्यांनाच पुन्हा मते देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारी ही नागरी सहकारी बँक मोडित काढण्यास हातभार लावायचा की ही प्रशासनाचा तगडा अनुभव असलेले उमेदवार निवडून देऊन बँकेला नव्याने भरभराटीच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हायचे? याचा निर्णय बँकेच्या मतदारांनी घ्यावा, असे आवाहन परिवर्तन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

 मार्च २०१६ ते २०२२ या कालखंडात भारतीय बँकिंग क्षेत्राला अमूलाग्र बदलांना सामोरे जावे लागले असून त्यांच्या कार्यशैली व विकासामध्ये अवरोध निर्माण झाला आहे. सध्याचा कालखंड हा एकूणच बँकिंग क्षेत्राची वृद्धी व उभारीस पुरक ठरणार असल्यामुळे या काळात बँकेच्या संचालक मंडळाची धुरा ही तज्ज्ञ व अनुभवी मंडळींच्या हाती देऊन अत्यंत कौशल्यपूर्ण, पारदर्शक आणि बँकेचा नावलौकिक व गुणात्मक तसेच संख्यात्मक विकासास कटिबद्ध असलेल्या व्यक्तींनी व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन पॅनल या बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.”

प्रल्हाद अंभोरे,निवृत्त जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र. –बी. के. आदमाने,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता

 हे आहेत परिवर्तन पॅनलचे उमेदवारः
१. प्रशांत विठ्ठलराव कासोदकर हे उमेदवार उच्च विद्याविभूषित असून व्यापार क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कौशल्याने नावलौकिक मिळवला आहे.

२. डॉ. प्रमोद मोतीराम दुथडे हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ते ओळखले जातात.

३. प्रल्हाद भगवानराव अंभोरे हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होते. राष्ट्रीयकृत बँकेतील सेवेचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञान यामुळे डबघाईला आलेल्या बँकेला उर्जितावस्था कशी मिळवून द्यायची यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

४. बाबुराव केरबा आदमाने   हे उमेदवार बी. के. आदमाने नावाने ओळखले जातात. आदमाने हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असून सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रशासनाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते धम्म चळवळीतही सक्रीय आहेत. बी. के. आदमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत आले आहेत.

५. मुरलीधर दगडोजी सोनवणे हे औरंगाबाद महानगरपालिकेत शहर अभियंतापदावर कार्यरत होते. एम.डी. सोनवणे या नावाने ते ओळखले जातात. महापालिकेच्या सेवत असताना त्यांना समाजासाठी शक्य तितके योगदान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

६. चक्रधर आसाराम मगरे हे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत. त्यांनाही प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख राहिली आहे.

७. बळवंत माणिकराव रगडे या उमेदवारालाही प्रशासनातील दांडगा अनुभव असून पाटबंधारे विभागात अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले आहेत.

८. रमेश विठ्ठलराव बनसोड हे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत होते. धम्म चळवळीत ते सक्रीय असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या बुद्ध विहाराच्या उभारणीत त्यांनी योगदान दिले आहे.

९. डॉ. रंजना लक्ष्मण भालेराव (दंदे) या उच्च विद्याविभूषित असून त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली स्वतःची अशी ओळख आणि लौकीक कमावला आहे.

१०. ज्योती मनोज आदमाने या महिला राखीव गटातील उमेदवार  असून त्याही उच्च विद्याविभूषित असून व्यापर क्षेत्रात त्यांनी स्वतःचे कर्तृत्व आणि कौशल्याच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

सहा संचालकांचे उमेदवारी अर्जच अवैधः आरबीआय, महाराष्ट्र शासन, सहकारी बँकिंग क्षेत्रातील नियामकांच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे आणि नुकसान भरपाईसाठी जबाबदारी निश्चित करूनही नुकसान भरपाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विद्यमान संचालक मंडळातील सहा संचालकांना ही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यात बँकेचे अध्यक्ष आत्माराम विष्णू बोराडे, बँकेचे उपाध्यक्ष प्रज्ञाशील पाटील,  युवराज दौलतराव दांडगे, सीताराम आव्हाड, पुष्पा खिल्लारे (धुळे),  आणि रतन भालेराव यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ (१)(iii)(iv) नुसार आणि बँकेच्या मंजूर उपविधीच्या कलम ४५(g) नुसार या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!