डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय युवा महोत्सवाची ’चॅम्पियनशिप’, तब्बल २१ पारितोषिकांसह जिंकले विजेतेपद!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने तब्बल सहा वर्षानंतर  केंद्रीय युवा महोत्सवाच्या विजेतेपदावर नाव कोरले. विविध गटातील ढालीसह २१ पारितोषिके जिंकून या संघाने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.

कलावंतांच्या टाळ्या, शिट्ट्या व ढोल तासांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. या महोत्सवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने विजेतेपदासह एकूण २१ पारितोषिके जिंकली. ललित कला गटातील सातही कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सांघिक विजेतेपद व प्रा.दिलीप बडे स्मृती चषक जिंकला. या संघास संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.वैशाली बोधेले, डॉ.गजानन दांडगे, गौतम सोनवणे आदींचे मार्गदर्शन लाभले.

धाराशिव (उस्मानाबाद) उपपरिसरातील संघानेही ८ पातिरतोषिकांसह नाटयगटातील विजेतेपद व जगन्नाथराव नाडापुडे चषक जिंकला. या संघास लोककला विभागप्रमुख डॉ.गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

विभागनिहाय विजेते संघ असे

  • ललितकला विभाग उत्कृष्ट संघः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
  • वाड्ःमय विभाग उत्कृष्ट संघः बलभीम महाविद्यालय, बीड.
  • महाराष्ट्राची लोककला उत्कृष्ट संघः देवगिरी महाविद्यालय.
  • जगन्नाथराव नाडापुडे नाटयगट चषकः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव (उस्मानाबाद)
  • डॉ.दिलीप बडे ललित कला चषकः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
  • डॉ.संजय नवले लोककला चषकः देवगिरी महाविद्यालय.
  • उत्कृष्ट ग्रामीण संघः शिवाजी महाविद्यालय, कन्नड.  उत्कृष्ट संघः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

ढोल, टाळ्या अन् शिट्ट्यांचा जल्लोष

या ’केंद्रीय युवा महोत्सव’चा समारोप हजारो कलावंताच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२८) जल्लोषत करण्यात आला. ढोल, शिट्या, टाळयांच्या गजरात विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. अभिनेते समीर चौगुले, अभिनेते श्याम राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.

शिकणे थांबले, तो संपला: समीर चौघुले- अभिनय हा एक प्रयोग असतो. तो कधी फसतो, कधी जमतो. ’अनप्रेडिक्टेबल’ असलेल्या प्रयोगातून आपण खूप काही शिकत असतो. तेव्हा आयुष्यभर शिकत राहा. शिक्षण थांबविला की तुम्ही  संपून जाल. अधोगती होईल हे लक्षात ठेवा, असा सल्ला अभिनेते समीर चौघुले यांनी युवा कलावंतांना दिला.अभिनय हा कोकणातल्या नागमोडी रस्त्यासारखां असतो. तेव्हा ’ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’ समजून कामाला लागा. कलेवर प्रेम करणारा जिंदादिल माणूस म्हणजेच कुलगुरु डॉ.विजय फुलारी आहेत, असेही समीर चौघुले म्हणाले.

कलेची माती नको, मातीतील कला दाखवा:श्याम राजपूत- जमत नसलेल्या कलेची माती करण्यापेक्षा आपल्या मातीतील कला दाखवा. तुम्ही नक्कीच प्रगती कराल, असे आवाहन अभिनेते श्याम राजपूत यांनी केले. विद्यापीठाचा माजी विद्यार्थी म्हणून मिळालेला सन्मान आणि अहिराणी भाषेने आपणास मोठे केले. नव्या पिढीला माध्यमाचं मोठे ’एक्सपोजर’ आहे, असेही ते म्हणाले.

लोककला’ महोत्सवही घेणार: कुलगुरु- मराठवाडयाच्या गुणी कलावंतासाठी एकांकिका महोत्सवासोबतच लोककलेचा स्वतंत्र महोत्सव घेण्यात येईल, अशी घोषणा यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केली. कलेला उत्तमरितीने दाद द्या, मात्र धांगडधिंगा चालणार नाही. पुढील वर्षी महोत्सवात बेशिस्त अजिबात खपवून घेणार नाही, असेही कुलगुरु म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *