
वॉशिंग्टनः डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून सोमवारी शपथ घेतली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ट्रम्प यांनी आज रात्री १०.३० वाजता शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेला उद्देशून दिलेल्या पहिल्याच भाषणात ‘आता अमेरिकेचे सुवर्ण युग आले आहे. आता अमेरिकेचे वाईट दिवस (बुरे दिन) गेले आहेत’ असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील दुसरे असे राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एका कार्यकाळाच्या खंडानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी ग्रोवर क्लीवलँड यांनी अमेरिकेचे २२ वे ( सन १८८५-१८८९) आणि २४ वे (सन१८९३-१८९७) शपथ घेतली होती.
शपथविधीपूर्वी अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचे व्हाइट हाऊसमध्ये स्वागत केले. सेंट जॉन्स एपिस्कोपल चर्चमध्ये प्रार्थना करून ट्रम्प आणि त्यांची पत्नी व्हाइट हाऊसमध्ये आले. दोघेही शपथविधी सोहळ्यासाठी कॅपिटॉलपर्यंत लिमोसीनमधून दाखल झाले.
खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा हा शपथविधी मोकळ्या मैदानात धडाक्यात करायचा होता. त्यांच्या शपथविधीसाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांच्या समर्थकांनी गर्दीही केली होती. परंतु थंडीमुळे हा शपथविधी समारंभ कॅपिटॉल रोडुंटामध्ये बंद सभागृहात स्थलांतरित करावा लागला.
मी दुसऱ्यांदा राष्ट्रपती ही नव्या रोमांचक युगाची सुरूवात
राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाचे दुष्ट, हिंसक आणि अनुचित शस्त्रीकरण संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे सुवर्ण युग आतापासूनच सुरू होऊ लागले आहे. आजपासून आमचा देश भरभराटीला येईल आणि त्याचा सन्मान केला जाईल. मी अगदी सहजपणे अमेरिकेला पहिल्या क्रमांकावर ठेवेन. आपण दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनल्यामुळे राष्ट्रीय सफलतेच्या एका नव्या रोमांचक युगाचा प्रारंभ झाला आहे, असे ट्रम्प म्हणाले.
