गंगापूर विधानसभेच्या मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांना ‘स्थळ पसंती’साठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत, अन्यथा होणार कारवाई


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील दुबार नावे असलेल्या मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत नेमके कोणत्या ठिकाणी ठेवायचे याबाबत पुराव्यांसह ‘स्थळ पसंती’ कळवण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून या मुदतीनंतर लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळवले आहे.

गंगापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ३६ हजार मतदारांची नावे दुबार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी १७ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन केला होता. मतदार यादीत दुबार नावे असणे हे संघटित गुन्हेगारीसारखेच कृत्य असून याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल करण्यात आला आहे. त्यांनी योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

एका व्यक्तीच्या पत्त्यावर ७७६ मतदार नोंदवण्यात आले. अन्य एकाच्या घरच्या पत्त्यावर १७१ नोंदवण्यात आले. एकट्या रांजणगाव सर्कलमध्ये ४ हजार ५५७ मतदारांची नावे दुबार आली आहेत, असे आ. चव्हाण म्हणाले. या तक्रारींची दखल घेण्यात आली असून मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याचे संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह ३१ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म ७ भरुन द्यावा, अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे डॉ. सुचिता शिंदे यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व तहसील कार्यालय गंगापूर येथे गंगापूर विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबत चौकशी व कारवाई करण्यासाठी १० रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली व भारतीय लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५० अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे १३ ते १५ या कालावधीत दुबार मतदारांची पडताळणी व नाव वगळणी याबाबत फॉर्म क्रमांक ७ भरण्यासंदर्भात विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १५१ मतदारांचे नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म क्रमांक ७ भरण्यात आले. अन्य मतदारांबाबतही मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यासंदर्भात बैठक घेऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी या दुबार मतदारांच्या याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपलब्ध करुन दिल्या असून जे मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत त्याबाबत पंचनामा करावा, असे निर्देश दिले आहेत. तरी गंगापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी प्राप्त दुबार मतदारांची यादी , तक्रारी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळ www.chhatrapatisambhajianagar.maharashtra.gov.in येथे प्रसिद्ध केली आहे.

याच याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्या आहेत. मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करावे. आपले नाव त्यात दुबार असल्यास ते नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे याबाबत आवश्यक पुराव्यांसह  मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे ३१ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संपर्क साधावा व जेथून नाव वगळावयाचे आहे तेथे फॉर्म नं.७ भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्यावा. अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असेही डॉ. सुचिता शिंदे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!