
मुंबई: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठवता येणार आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.
या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत्त, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award-2025 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक /प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक /प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक /प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठवताना सदर बंद लिफाफ्यावर /पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२६ हा राहील.
विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी कळवले आहे.
बृहन्महाराष्ट्रासाठी सरफोजीराजे पुरस्कार
याच कालावधीत ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठवता येणार. प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.
‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (पुरस्कार रक्कम १ लाख रूपये) प्रदान करण्यात येणार आहे.
बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे ३० जानेवारी २०२६ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक /प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
