
मुंबई: यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात ५ व ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते १० या वेळेत ‘गौरवगाथा संविधानाची’ सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमेय पाटील, संगीत संयोजन योगेश पवार, सुप्रसिध्द गायक दिनेश हेलोडे, सचिन आगवणे, नितेश मोरे आणि गायिका संगीता पांचाळ, निवेदन प्रतिक पवार करणार आहेत. ६ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रग्रंथ- आधारस्तंभ लोकशाहीचा’ हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकांत ४० पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश आहे.
‘गौरव गाथा संविधानाची’ या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
