घाटीत आता सीटी स्कॅन, एमआरआय ५० टक्क्यांनी स्वस्त, जिल्हा नियोजन समिती उचलणार ५० टक्के शुल्काचा भार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी)  सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी रुग्णांना जे शुल्क आकारले जाते त्यातील ५० टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागेल, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.या बैठकीस इमाव, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे,  आ. विक्रम काळे, आ.राजेश राठोड,  आ. संजय केणेकर, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ इत्यादींची उपस्थिती होती.

सन २०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करीता १०४ कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. तर ३ कोटी १४ लक्ष रुपये निधी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना करीता प्राप्त झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या घटनेची चौकशी करण्यात येईल. दरम्यान मृत महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त वीज अटकाव यंत्रे बसवावीत. जेणेकरुन वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांना थांबवता येईल. त्यासाठीही जिल्हा नियोजन समिती निधी देईल, असे शिरसाट म्हणाले.

जायकवाडी प्रकल्पासंदर्भात ‘मेरी’ या संस्थेने दिलेल्या अहवालासंदर्भात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतील व आपले म्हणणे मांडतील. महावितरणने ट्रानस्फार्मर बसवून देण्याचे काम पूर्ण करावे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असेही शिरसाट म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय साठी निम्मे शुल्क जिल्हा नियोजन समिती देईल. तसेच जिल्ह्यात दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीची दुरुस्ती करता यावी यासाठी प्रत्येक आमदारांस त्यांच्या कार्यक्षेत्रात कामे करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जासंदर्भात येत्या सोमवारी बॅंकांची आढावा बैठक घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

वंदे मातरम सभागृह मनपाकडे

खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या निर्मितीची योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्याठिकाणी अधिकाधिक सौर उर्जेचा वापर करण्याचे नियोजन आहे. तसेच वेरुळ येथील मालोजीराजे गढी येथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील वंदे मातरम सभागृह हे देखभालीसाठी महापालिकेकडे देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड करावी. त्याचे वेळापत्रक तयार करुन लोकप्रतिनिधींना द्यावे, जेणेकरुन त्यांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!