
मुंबईः रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी २३२ शिक्षक आणि १०७ शिक्षकेतर अशा एकूण ३३९ पदनिर्मितीस मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. या विद्यापीठाचे कामकाज पूर्ण क्षमतेने होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. या सर्व पदांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पदांचा तपशील असाः शिक्षक पदेः प्राध्यापक-३४, सहयोगी प्राध्यापक-६०, सहाय्यक प्राध्यापक-१३८ एकूण २३२.
शिक्षकेतर पदेः उप कुलसचिव-७, सहाय्यक कुलसचिव-७, कक्ष अधिकारी-१४, सहाय्यक कक्ष अधिकारी- ७, वरिष्ठ लेखापाल-६, लेखापाल-१२, माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामर-१, वरिष्ठ ग्रंथालय सहायक-१, कनिष्ठ ग्रंथालय सहायक-२, कनिष्ठ लिपिक-८, वरिष्ठ लिपिक-८, कनिष्ठ सहायक (सर्वसामान्य)-१, कनिष्ठ सहायक (वित्त)-१, तंत्रसहायक-८, प्रयोगशाळा सहायक-२४ एकूण १०७.
