मुंबईः महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यास तीनच दिवस शिल्लक असताना काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे आले आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भातच असतानाच काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही विदर्भाकडेच सोपवले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही संख्याबळ कमी आहे. तुलनेने काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आले आहे.
विरोधी पक्षनेतेपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवायची, याबाबत गेला आठवडाभर काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींमध्ये विचारमंथन सुरू होते. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चाही केली होती. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, सुनिल केदार यांची नावे चर्चेत होती. अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वडेट्टीवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला.
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विदर्भाकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्याच विदर्भाकडे विरोधी पक्षनेतेपदही सोपवून बालेकिल्ला अधिक मजबूत करून भाजपवर चढाई करण्याची रणनिती काँग्रेसने आखल्याचे सांगितले जाते.
राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने काही महिन्यांसाठी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी वडेट्टीवारांवर सोपवली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी विरोधी पक्षनेते बनलेल्या वडेट्टीवारांनी भाजपवर कठोर प्रहार केले. आक्रमकपणा, अभ्यासूपणा, विविध विषयांची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती हे वडेट्टीवारांचे विशेष गुण आहेत.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या आठवड्यात संपणार आहे. आधीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवायच पावसाळी अधिवेशन पार पडले. त्यामुळे अखेरच्या तीन दिवसात विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात किती आक्रमक होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.