अकोलाः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रा रोखण्याची मागणी केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी एकनाथ शिंदे सरकारला खुले आव्हान दिले आहे. महाराष्ट्र सरकारला भारत जोडो यात्रा रोखावीशी वाटत असेल तर त्यांनी ती रोखावी. त्यांनी भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न करून पहावा, असे राहुल गांधी म्हणाले. कोणाला एखादा विचार मांडायचा असेल तर तो मांडू दिला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली होती. सावरकरांना त्यांनी माफीवीर संबोधले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा रोखा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली. शेवाळे यांच्या या मागणीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या भूमिकेतून दाखवून दिले. सावरकांबाबत प्रश्न विचारताच राहुल गांधी यांनी सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. या माफीनाम्यातील शेवटची ओळही त्यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली, असा पुनरूच्चारही राहुल गांधी यांनी केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घाबरल्यामुळे इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे नेते अनेक वर्षे तुरूंगात राहिले, परंतु त्यांनी माफीनाम्याची कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही. परंतु सावरक घाबरल्यामुळे त्यांनी माफीनाम्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगाच दिला, असे राहुल गांधी म्हणाले.
या लढाईला आगोदर समजून घेतले पाहिजे. लोकशाहीत एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांतील नाही. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थांवरही भाजपचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतो, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीही तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे अन्य कोणताही उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल, याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले तरी त्यांना रोजगार मिळेल याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरूण मला भेटला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
दुसरी समस्या शेतकऱ्यांबद्दल आहे. शेतकरी देशाला अन्न पुरवतो. मात्र त्याला सध्या कोणताही आधार नाही. त्याच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी पीक विमा भरतो, मात्र त्याला पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचे कर्जदेखील माफ होताना दिसत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
देशात सध्या हिंसा आणि द्वेष पसरवला जात आहे. भाजपचे नेते तरूणांशी बोलत नाहीत. ते तरूणांशी आणि शेतकऱ्यांशी बोलत असते तर त्यांच्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या असत्या. या वातावरणाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. भारत जोडो यात्रेची गरज नाही, असे लोकांना वाटत असते तर लोकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केलीच नसती, असेही राहुल गांधी म्हणाले.