शिर्डीः पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या आणि महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. उत्कर्षा रूपवते लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून वंचितच्याच तिकिटावर त्या शिर्डीतून त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी,अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी होती. उत्कर्षा रूपवते या शिर्डीमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. परंतु महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे त्या नाराज नाराज होत्या. त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस पदाधिकारीही नाराज होते.
उत्कर्षा रूपवते या काँग्रेसच्या राज्य महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. आमची तिसरी पिढी काँग्रेस पक्षात होती, आज प्रवास थांबवते, असे सांगत त्यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. रूपवतेंचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रूपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो, याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे, असे उत्कर्षा रूपवते यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.
दरम्यान, उत्कर्षा रूपवते या लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेटही घेतली होती.
वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर त्या शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.