मंत्रिमंडळाचा शपथविधी काही तासांवर, तरीही संभाव्य मंत्र्यांची नावे मात्र अद्याप गुलदस्त्यातच; कोणाला गेले शपथविधीसाठी फोन?


नागपूरः  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा शपथविधी काही तासांवर आलेला असतानाच संभाव्य मंत्र्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यात संभ्रम आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा कोणता आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार? याबाबत तर्क लावले जात असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.

आज दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कोणत्या पक्षाचा कोणता आमदार मंत्री होणार? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत असली तरी त्याला दुजोरा मात्र मिळत नाही. भाजपकडून मंत्रिपदासाठी अनेक प्रबळ दावेदार असताना नावेच जाहीर केली गेली नसल्यामुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

आज दुपारी किती मंत्री शपथ घेणार? महायुतीतील तीन घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला नेमकी किती मंत्रिपदे येणार? हे सारेच अद्यापही गुलदस्त्यात आहे. शनिवारी दुपारनंतर आमदारांना मंत्रिपदासाठी फोन येणार असल्याचे सांगितले जात होते, त्यामुळे तिन्ही पक्षांचे इच्छूक शनिवारी दुपारी फोनची वाट बघत बसले होते. परंतु कोणालाच काहीही निरोप दिला गेला नसल्याची माहिती आहे.

‘या’ आमदारांना गेले फोन?

भाजपः  चंद्रकांत पाटील, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, भीमराव केराम यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहण्याचे फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसः छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अजित पवार, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, सना मलिक, इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मंत्रिपदासाठी निरोप दिल्याचे सांगितले जाते.

शिवसेनेकडून कोणाला संधी?

प्राप्त माहितीनुसार, कोकणातून उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम, पश्चिम महाराष्ट्रातून शंभराज देसाई, प्रकाश आबिटकर, उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील आणि दादा भुसे, मराठवाड्यातून संजय शिरसाट, विदर्भातून आशिष जैस्वाल आणि ठाण्यातून प्रताप सरनाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!