छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’, जागतिक पुरस्कारावर प्रथमच भारतीयाचे नाव!


न्यूयॉर्क: छत्रपती संभाजीनगरातील जागतिक किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. जागतिकस्तरावरील या पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवणारे बैजू पाटील हे पहिलेच वन्यजीव छायाचित्रकार ठरले आहेत. या पुरस्कारासाठी बैजू पाटील यांनी निसर्गाच्या अफाट विश्वातील एक ‘दुर्मिळ क्षण’ टिपण्यासाठी तब्बल १५ दिवस संयमी पाठलाग करून भरतपूरच्या अभयारण्यात टिपलेले छायाचित्र पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. १०९ देशांतील हजारो दिग्गज छायाचित्रकारांना मागे टाकत बैजू पाटील यांनी मिळवलेले हे यश भारतीय छायाचित्रण क्षेत्रातील ऐतिहासिक सुवर्णक्षण ठरले आहे.

राजस्थानातील भरतपूर अभयारण्यात बैजू पाटील यांनी एका अशा संघर्षाची गाथा कॅमेऱ्यात कैद केली, जी पाहून जागतिक स्तरावरील परीक्षकही थक्क झाले. पाण्याखाली शिकार करणारा ‘स्नेक बर्ड’ आणि त्याच्या चोचीतील मासा हिसकावण्यासाठी आकाशातून झेप घेणारा ‘ग्रे हेरॉन’ (राखाडी बगळा) यांच्यातील अटीतटीचा संघर्ष बैजू पाटील यांनी या छायाचित्रात टिपला आहे.

एक सेकंदाचा हा क्षण टिपण्यासाठी बैजू पाटील यांनी तब्बल १५ दिवस एकाच जागी बसून निसर्गाच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यांच्या या संयमी आणि निश्चयी परिश्रमातून ‘स्नेक बर्ड अँड ग्रे हेरॉन’ हे छायाचित्र टिपण्यात यश मिळाले. त्याट छायाचित्राला जगातील सर्वोत्तम कलाकृतीचा बहुमान मिळाला आणि ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’वर बैजू पाटील यांची नाममुद्रा कोरली गेली. बैजू पाटील यांना फोटोग्राफीचा ३७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बैजू पाटील यांना यावर्षी पाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत.

कॅमेरा बोलत नाही, तो निसर्गाला ऐकतोः हे यश माझे नसून भारतीय निसर्गाचे आहे. ३७ वर्षांच्या प्रवासात मी शिकलो की, जंगलात गेल्यावर तुम्ही शांत राहायचे असते. निसर्ग स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतो. हा पुरस्कार माझ्या देशातील आगामी पिढीला निसर्ग संवर्धनासाठी प्रेरित करेल, अशा भावना बैजू पाटील यांनी हा पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. तंत्रज्ञानापेक्षाही ‘दृष्टी’ आणि ‘संयम’ महत्त्वाचा असतो, हेच बैजू पाटील यांनी या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

‘निसर्ग ओळखा’नंतर आता ‘निसर्ग वाचा’अभियान: बैजू पाटील हे केवळ छायाचित्रकार नसून ते निसर्गाचे अभ्यासक आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या एम.जी.एम. विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी हजारो तरुणांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडले आहे. त्यांनी सुरू केलेले ‘निसर्ग ओळखा’ हे अभियान महाराष्ट्रात घराघरात पोहोचले असून आता ते ‘निसर्ग वाचा, निसर्ग जपा’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!