
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘अनंत’ इच्छाशक्तीच्या बळावर ‘पंकज’ फुलणारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचेच आज पुढे आले आहे. तीन सहयोगी प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी या कार्यालयातील प्रशासन अधिकारी संजय मार्तंड जगताप यांच्याविरुद्ध बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ‘सांज’सकाळी चालणाऱ्या एकूणच भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील प्राध्यापकांची स्थान निश्चिती, वरिष्ठ वेतनश्रेणी, पदोन्नती इत्यादींच्या प्रस्तावांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने रितसर मंजुरी दिल्यानंतर ते प्रस्ताव विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात दाखल केल्यानंतर प्रत्येक पातळीवर पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव पुढे सरकतच नाही, अशी विभागातील प्राध्यापकांची तक्रार होती. पण त्याबाबत तक्रार करायला कोणीही प्राध्यापक धजावत नव्हते.
विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात होत असलेल्या या आर्थिक पिळवणुकीला बळी पडलेल्या एका प्राध्यापकानेच शेवटी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार अध्यापकाच्या सहयोगी प्राध्यापकपदाचा स्थानिश्चितीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी जगताप यांनी १० हजार रुपये व वेतन निश्चिती प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रुपये असे एकूण २० हजार रुपये लाच कार्यालयातच लगेच स्वीकारली.
या लाचखोरीनंतर प्रशासन अधिकारी संजय मार्तंड जगताप यांनी तक्रारदार व त्यांचे दोन सहकारी यांच्या वेतन निश्चिती प्रकरणावर स्वाक्षरी करण्यासाठी स्वतःसाठी व वरिष्ठासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण ४५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येकी १५ हजारांची रक्कम १० हजारांवर आली म्हणजे मागितलेल्या लाचेची एकूण रक्कम ३० हजारावर आली. परंतु त्या प्राध्यापकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी बीडच्या एसीबीचे पथक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात धडकले. त्यावेळी जगताप यांनी पंचासमक्ष ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकरण्याचे मान्य केले. परंतु त्यांना संशय आल्याने ते लाचेची रक्कम न स्वीकारताच कार्यालयाबाहेर निघून गेले.
…तेव्हापासूनच जगताप ‘फरार’
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी एसीबीच्या जाळ्यात अडकता अडकता सहीसलामत निसटून गेलेला जगताप तेव्हापासून वैद्यकीय रजा टाकून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातून फरार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापने ज्या कारणासाठी वैद्यकीय रजा टाकली त्याची पडताळणी करण्यासाठी बीडच्या एसीबीचे पथक जगताप रहात असलेल्या नाशिकच्या सैलानी बाबा स्टॉप जेल रोड, आंबेडकरनगरजवळ या परिसरातील त्याच्या निवासस्थानी जाऊन आले. परंतु तेथे तो आढळून आला नाही. परंतु एसीबीच्या पथकाला मात्र त्याची पत्नी आढळून आली. त्यामुळे संजय जगताप खोटे कारण सांगून वैद्यकीय रजा टाकून ‘फरार’ झाल्याचेच दिसून येते.
…आणि मग गुन्हा
एसीबीचा सापळा लागल्याचा संशय आल्यापासून फरार झालेले प्रशासन अधिकारी संजय मार्डंत जगताप हे आपल्याकडून आता मागणी केलेल्या लाचेची रक्कम स्वीकारणार नाहीत, याची खात्री पटल्याने तक्रारदार प्राध्यापकाने पुढील कारवाई करावी असे एसीबीच्या पथकास कळवल्याने बीडच्या एसीबीच्या पथकाने १५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून संजय जगतापविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जग’तापा’च्या वरिष्ठांनाही एसीबी घेणार का?
आपण मागितलेली लाचेची रक्कम ही फक्त आपल्या एकट्यासाठी नसून वरिष्ठासाठीही मागितलेली आहे, असे संजय मार्तंड जगतापचे म्हणणे एसीबीच्या रेकॉर्डवर आलेले आहे. त्यामुळे ज्या ‘भारदस्त’ वरिष्ठासाठी संजय जगतापने लाच मागितली, त्या वरिष्ठालाही एसीबी कारवाईच्या कचाट्यात घेणार की त्यांना मोकळे सोडून देणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
