
मुंबईः राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या (LLB) पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी शुक्रवारी रात्री उशीरा निवड यादी जाहीर केली असून पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ऑगस्टपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. महाविद्यालयांच्या पसंतीक्रम भरलेल्या ४० हजार ३२३ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ९८८ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे.
सीईटी सेलने तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली होती. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ४४ हजार ५३८ विद्यार्थ्यांपैकी ४० हजार ३२३ विद्यार्थ्यांनीमहाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते.
७,५७० जणांनाच पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज
महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी सीईटी सेलने शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली. या निवड यादीनुसार पहिल्या फेरीत १४ हजार ९८८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यापैकी ७ हजार ५७० विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तर उर्वरित ७ हजार ४१८ विद्यार्थ्यांना अन्य पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
प्रवेशासाठी फक्त तीनच दिवस
शुक्रवारी रात्री (८ ऑगस्ट) पहिल्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली असली तरी शनिवारी रक्षाबंधन आणि दुसऱ्या दिवशी रविवार अशा दोन सलग सुट्या आल्यामुळे पहिल्या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेशांना सोमवारपासूनच (११ ऑगस्ट) सुरूवात होणार आहे. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांत म्हणजेच ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीतच प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ही मुदत संपल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रिक्त जागांचा तपशील सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
