लोकसभेसाठी बीडमधून प्रीतम मुंडेंची उमेदवारी नक्की नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा बॉम्बगोळा; पुन्हा डॉ. कराडच आड?


मुंबईः मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आज ना उद्या त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल म्हणत म्हणतच विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. अशातच आता बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांची आगामी लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रीतम मुंडे यांची बीडमधून उमेदवारी नक्की नसल्याचा  बॉम्बगोळा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टाकला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रावसाहेब दानवे हे गुरुवारी बीडच्या दौऱ्यावर होते. बीड लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व मानले जाते. महायुतीमध्ये बीडच्या जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. बीडमधून भाजपचा उमेदवार कोण? असे दानवे यांना विचारले असता खासदार प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड आणि माझी उमेदवारी या ठिकाणी नक्की नाही, असा बॉम्बगोळा दानवे यांनी टाकला.

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, हे आमच्या पक्षातील पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतो. ते जो निर्णय घेतील तो अंतिम असतो. पण आम्ही तिघेही उमेदवार आहोत, असेही दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला असून प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट होणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजप उमेदवारांची यादी माझ्या खिशात!

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १६ राज्यातील लोकसभेच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटू शकला नसल्यामुळे या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात असल्याचे वक्तव्य केले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दानवे यांच्या  वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुगली टाकून संदिग्धता कायम

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दानवेंनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असे म्हणत गुगली टाकली. धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतदारसंघांचाही दानवेंनी उल्लेख केला. विशेष म्हणजे थोड्यात वेळात याबाबत सविस्तर बोलतो, असे म्हणत दानवेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे.

पुन्हा डॉ. कराडच आड?

परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेतले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु भाजपने डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रीतम मुंडे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरवत भाजपने डॉ. कराड यांनाच मंत्रिमंडळात घेऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री केले.

आता तेच डॉ. कराड बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असल्याचे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाच्या राजकीय वाटचालीत कराड वारंवार आड येणार की काय?, अशी चर्चा मुंडे समर्थकात होऊ लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!