
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कन्नडच्या शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. व्ही.एन. भोसले यांची ‘दुहेरी बोगस’ नियुक्ती हेही छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध उद्योगपती व शिक्षण सम्राट मानसिंग बाळासाहेब पवार यांच्या ‘श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळा’वरील एकहाती साम्राज्याच्या पतनाचे कळीचे कारण ठरले आहे. डॉ. भोसले हे संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मानसिंग पवार यांनी त्यांची वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आणि संस्थेच्या खात्यातून त्यांना वेतन अदा करून निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह धर्मादाय आयुक्त आर.एस. पावसकर यांनी मानसिंग पवार यांच्यासह नऊ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कन्नडच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाविरुद्ध छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह धर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांच्यापुढे बिपीन थोरात आणि दिलीप पाटील यांनी दाखल केलेल्या खटल्यात दोनच कळीच्या मुद्यांवर युक्तीवाद झाला. त्यापैकी एक मुद्दा होता मानसिंग पवार व संस्थेच्या अन्य विश्वस्तांनी संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपशी ठरत कर्तव्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आणि दुसरा मुद्दा होता मानसिंग पवार यांनी प्रा. डॉ. व्ही. एन. भोसले हे संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असतानाही बेकायदेशीरपणे त्यांची वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकपदी नियुक्ती केली आणि संस्थेच्या खात्यातून त्यांना १ लाख ८६ हजार २४५ रुपये अतिरिक्त वेतन अदा केल्याचा. हा मुद्दाही मानसिंग पवार यांचे शिक्षण संस्थेवरील साम्राज्य संपुष्टात येण्यास महत्वाचा ठरला आहे.
१ मार्च १९९७ रोजी गव्हर्निंग कौंसिलच्या झालेल्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावानुसार मानसिंग पवार यांनी प्रा. डॉ. विजय नानासाहेब उर्फ व्ही.एन. भोसले यांना संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर १९९८ अशा दोन वर्षाच्या काळासाठी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून २ मार्च १९९७ रोजी नियुक्तीचे आदेश दिले. प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले हे संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ अध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मानसिंग पावर यांनी डॉ. भोसले यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या खात्यातून त्यांना बेकायदेशीरपणे १ लाख ८६ हजार २४५ रुपये वेतन बेकायदेशीरपणे अदा केले, असा आरोप बिपीन थोरात यांनी सह धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणीदरम्यान केला. असा आरोप दिलीप पाटील यांनीही केला. लोकायुक्तांनी १२ फेब्रुवारी २०१४ च्या आदेशान्वये प्रा. डॉ. भोसले यांच्या दोन वेतनवाढी रोखल्याचा मुद्दाही थोरात यांनी निदर्शनास आणून दिला.
छत्रपती संभाजीनगरच्या उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांनी २२ जुलै १९९९ रोजी दिलेल्या पत्रानुसार प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून वेतनापोटी दिलेली १ लाख ६४ हजार ८७९ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, असा युक्तिवाद मानसिंग पवार यांनी केला. परंतु उलट तपासणीदरम्यान त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली.
प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले हे संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात १ जानेवारी १९९७ रोजी रूजू झाले होते का? त्यांनी १ सप्टेंबर १९९४ ते २१ डिसेंबर १९९६ या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून १ लाख ६४ हजार ८७९ रुपये वेतन घेतले होते का? आणि त्यांनी त्याच कालावधीसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून १ लाख ८६ हजार २४५ रुपये वेतन अदा करण्यात आले होते का? या प्रश्नांची उत्तरे देण्यास मानसिंग पवार यांनी उलट तपासणीत टाळाटाळ केली आणि पुराव्यांमध्ये महत्वाची तथ्ये दडपण्याचा प्रयत्न केला.
प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले यांची नियुक्ती आणि त्यांना देण्यात आलेल्या वेतनाचा मुद्दा सक्षम अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयाने ठरवला असल्याने या प्रकरणात त्यावर पुन्हा चर्चा करता येणार नाही, असा मुद्दा मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींच्या वकिलांनी मांडला. त्यावर प्रा. डॉ. व्ही. एन. भोसले यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून दिलेले वेतन वसूल करण्यात आले आणि ते सरकारकडे जमाही करण्यात आले असले तरी या कृतीमुळे संस्थेच्या निधीचा तात्पुरता अपहार झाला, असे निरीक्षक सह धर्मादाय आयुक्तांनी नोंदवले.
संबंधित वेळेत मानसिंग पवार आणि डॉ. दामोदर शिंदे हे संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. त्यांनीच प्रा. डॉ. व्ही. एन. भोसले यांना दुहेरी वेतन घेण्याची परवानगी दिली आणि ही वेतनाची रक्कम वसूल होईपर्यंत संस्थेचा निधी बिनव्याजी वापरण्याची अनुमती देऊन हे सुलभ केले, असे सह धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे.
मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींनी संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरून त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक धर्मादाय संस्था कायद्याच्या कलम ३६ (१)(अ) चे उल्लंघन करून भूखंड क्रमांक १०७ ते १२६ बेकायदेशीरपणे विकले किंवा हस्तांतरित केले. शिवाय डॉ. व्ही.एन. भोसले यांना संस्थेच्या निधीचा बिनव्याजी वापर करण्याची परवानगी देऊन संस्थेचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक धर्मादाय संस्था कायद्याच्या कलम ४१ड (क) आणि (ड) अंतर्गत मानसिंग पवार यांच्यासह अन्य प्रतिवादी विश्वस्त मंडळातून काढून टाकण्यास पात्र आहेत. त्यामुळे मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींना श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कन्नड या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळातून काढून टाकण्यात आले आहे, असा निकाल सह धर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांनी दिला.

