कन्नड: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागापूर येथे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका व्यक्तीच्या राहत्या घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्यामुळे या घरातील लोखंडी पत्रा वाकून गेला. या स्फोटामुळे घरात असलेले ३५ वर्षीय समीर सलीम शेख हे ऐंशी टक्क्यांहून अधिक भाजून जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे कारण न स्पष्ट न झाल्यामुळे स्थानिक पोलिस बुचकळ्यात पडले असून छत्रपती संभाजीनगरहून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
जखमी समीर शेख यांच्या विषयी अधिक माहिती नाही. त्याचे वडील गावात फळे विक्री करतात. नागापूर हे साधारणतः पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात समीर शेख हे फळे विक्रीचा व्यवसाय करतात. झाडपाल्याचा व छाछू वैदू म्हणून काम करतात. त्याने आपल्या घराच्या मागे पत्र्याचे शेड बनवलेले आहे. या शेडमध्ये दरवाजा बंद करून ते आत काय करतात हे अन्य कोणालाही माहीत नव्हते, असे नागापूरच्या सरपंच सुरेखा तायडे यांचा मुलगा डॉ. लक्ष्मीनारायण तायडे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
दुपारी एक वाजेच्या सुमारास समीर या पत्र्याच्या शेडमध्ये दरवाजा बंद करून बसलेला असताना अचानक स्फोट झाला. या आवाजाने शेजारचे ग्रामस्थ धाऊन आले. या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडचा लोखंडी दरवाजा अक्षरशः वाकून गेलेला होता. ग्रामस्थांनी गंभीर जखमी समीर शेख याला बाहेर काढले. त्याचा चेहरा विदीर्ण झालेला व शरीर ऐंशी टक्क्यांहून अधिक भाजलेले दिसून आले. त्यास खासगी वाहनाने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, उपनिरीक्षक सतीश बडे, दराडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गॅसची छोटी टाकी सुस्थितीत आढळून आली.
घटनास्थळी पोलिसांना विहिरीसाठी जिलेटीनचा स्फोट घेतात त्याप्रमाणे खड्डा पडून माती विखुरलेली दिसून आली. तेथे बरेच कापलेले लिंबू, त्यातून रसही काढलेला दिसून आला. स्फोटाचे कारण स्पष्ट होत नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला? स्फोटामुळे खोल खड्डा पडला आहे,त्या खड्ड्यात नेमके काय दडले आहे? स्फोट होऊनही गॅसची टाकी सुस्थितीत कशी राहिली? जखमी समीर शेख नेमका काय प्रयोग करत होता? समीर शेख जर जडीबुटीचा प्रयोग करत होता तर त्याठिकाणी कोणत्याही झाड पाला, कंदमुळे आढळून आली नाहीत. केवळ लिंबू कापलेले दिसून आले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की लोखंडी दरवाजा वाकून पडला. या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असल्याने बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले.