मुंबईः मी नाराज असल्याच्या चर्चा सतत होत असतात. विविध पक्षांकडून येणाऱ्या ऑफर लाईट नोटवर घेतल्या. मी काँग्रेस नेत्यांची दोनदा भेट घेतल्याच्या बातम्या आल्या. पण मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. अशा चर्चा पसरवणे हा माझा राजकीय करिअर संपवण्याचा डाव आहे, असा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. आपण राजकारणातून ब्रेक घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांची दोन वेळा भेट घेतली आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली.
अप्रामाणिकपणा माझ्या रक्तात नाही. लपूनछपून काम करणार्यांचा कंटाळा आला आहे. या सर्व चर्चांमधून अलिप्त राहण्यासाठी दोन महिन्यांची सुटी घेणार आहे. काही दिवसांचा ब्रेक घेऊन अंतर्मुख होणार आहे. राजकीय वाटचालीविषयी विचार करणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
एखाद्या घटनेविषयीची माहिती एखाद्या समाजाच्या जबाबदार नेत्याकडे आहे आणि तो म्हणतो की मी थोड्याथोड्या वेळाने देतो, तर हा जनतेचा अधिकारभंग नाही का? एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे जर एखादी माहिती असेल तर तिचा राजकीय फायदा घेण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायासाठी उपयोग करून शिक्षा दिली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
उद्या अटलजींची भाजप राहिली नाही असा विचार करण्याची वेळ येऊ नये
या सगळ्या गोष्टी बघून मी दुःखी झाले आहे. मी रोज बातम्या बघते की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. मला वाटते की, उद्या लोकांनी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटलजींची भाजप राहिली नाही, असा विचार करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आपले काम आहे. मी त्या भाजपच्या संस्कारामध्ये वाढले आहे. मला जेव्हा काही करायचे असेल, तेव्हा मी टिपेच्या सुरात सांगेन, असेही पंकजा म्हणाल्या.
आताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. मी तो ब्रेक घेणार आहे. एक-दोन महिने मी सुटी घेणार आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतेय, यावर चिवार करण्याची गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारावर विचार करणार आहे. त्याच वाटेवर मी आहे का, हे तपासून बघण्याची मला गरज आहे. या ब्रेकमध्ये मला आजच्या राजकारणावर विचारमंथन करायचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
वृत्तवाहिनीवर मानहानीचा दावा ठोकणार
मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली आणि काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या चालवण्यात आल्या. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. माध्यमांना कोणतीही बातमी देताना स्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही बातमी चालवणाऱ्या वृत्तवाहिनीवर मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.