बीडः केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन हे प्रकरण सातत्याने लावून धरणारे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. करूणा मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसानेच साडी नेसून पिस्तुल ठेवले होते. बीड पोलिस दलातील त्या व्यक्तीचे नावही मला माहीत आहे, असा दावा करून आ. धस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
करूणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यानंतर त्या ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीमध्ये गेल्या होत्या. त्यातून बराच संघर्षही उफाळला होता. करूणा मुंडे परळीत आल्या असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आले होते. त्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता आ. धस यांनी खळबळजनक दावा केला आहे.
करूणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नव्हती. ती बीड पोलिस दलातील एक व्यक्ती होती. साडी नेसून त्याच व्यक्तीने करूणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवले. त्याचे नावही मला माहीत आहे. पण ते तुम्हाला सांगणार नाही. त्याचे नाव मी पोलिस अधीक्षकांना सांगेन, असे आ. धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिस दलातील काही जणांच्या बदल्या वाल्मिक कराडने केल्या होत्या. यातील काही अधिकारीच आता त्याची चौकशी करत आहेत, असा दावाही आ. धस यांनी केला. तपास पथकातील एकाला बदली करून कराडने गडचिरोलीवरून आणलेले आहे. त्या अधिकाऱ्याने स्वामीनिष्ठा दाखवू नये. काही अधिकारी त्यांच्या अतिसंपर्कात आहेत,ही बाबही समोर आलेली आहे, असे आ. धस म्हणाले.
तपास पथकातील तेली साहेबांसह अन्य अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप नाही. त्यांच्या सोबत असलेल्या आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही माझी तक्रार नाही. पण क्लास-३ अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबद्दलची माहिती मी दिली आहे. त्यांनी मला त्या अधिकाऱ्यांबद्दल अधिकचे तपशील देण्यास सांगितले आहे. त्यांचे तपशील मी मुख्यमंत्र्यांना देईन, असेही आ. धस म्हणाले.
करूणा मुंडे यांच्या कारमध्ये आकाच्या सांगण्यावरून पिस्तुल ठेवण्यात आले होते. या प्रकरणी करूणा मुंडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. त्यामुळे पोलिस दलातील बिंदूनामावलीप्रमाणे माहिती घेण्यासाठी मी पत्र दिले आहे. बिंदूनामावलीप्रमाणे जिल्ह्यात कर्मचारी राहणार अशी मागणी केली आहे, असे आ. धस म्हणाले.
नैतिकतेच्या आधारावर मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत पदावर रहावे असे मला वाटत नाही. एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री रहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्रिपदापासून बाजूला करावे, असे मला वाटते. ही सर्व जनतेची भावना आहे, असेही आ. धस म्हणाले.