ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, आक्षेपार्ह वक्तव्याचा ठपका ठेवत बार काऊन्सिलकडून ‘शिक्षा’; हे मुद्दाम केले का?, सरोदेंचा सवाल


पुणेः पुण्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांच वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने सोमवारी ही शिस्तभंगाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची १२ नोव्हेंबरला सुनावणी असून या सुनावणीच्या एक दिवस आगोदरच हा निर्णय कळवल्यामुळे हे मुद्दाम केले गेले का? असा सवाल सरोदे यांनी केला आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत सहभागी असलेल्या वकिलांपैकी असीम सरोदे हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. आता महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करत त्यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केल्यामुळे त्यांना या सुनावणीत आता पुढील तीन महिने सहभागी होता येणार नाही.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना असीम सरोदे यांनी न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे न्यायपालिकेचा अपमान झाला आणि लोकांमध्ये न्याय व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण झाला अशी तक्रार एका तक्रारदाराने महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलकडे केली होती. तक्रारदाराने १९ मार्च २०२४ रोजी सरोदे यांना लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. परिणामी बार काऊन्सिलने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडीओ क्लिप पाहिल्या. या व्हिडीओमध्ये असीम सरोदे हे ‘राज्यपाल फालतू आहेत’ आणि ‘न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे’ अशी विधाने करताना स्पष्ट दिसतात. अशा वक्तव्यांमुळे लोकांचा न्यायालयावरचा विश्वास कमी होतो. वकील हा न्यायालयाचा अधिकारी असल्याने त्याने न्यायव्यवस्था आणि संवैधानिक पदांबद्दल आदर राखणे ही त्याची व्यावसायिक व नैतिक जबाबदारी आहे, असे घाटगे समितीने आपल्या निष्कर्षात नमूद केले आहे.

बार काऊन्सिलकडे सरोदेंचे स्पष्टीकरण

असीम सरोदे यांनी या चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडली आणि स्पष्टीकरण दिले होते. मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संवैधानिक पदाचा अपमान केलेला नाही. मी केलेले वक्तव्य ही लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. ‘फालतू’ हा शब्द अपमानार्थ नव्हे तर सामान्य बोली भाषेतून वापरला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि माझा हेतू न्यायव्यवस्थेवर टीका करणे नव्हे तर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता, असे स्पष्टीकरण त्यांनी बार काऊन्सिलच्या चौकशी समितीसमोर सादर केले होते.

असीम सरोदे हे सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या मुद्यांवर काम करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आहेत. त्यांनी विविध मुद्यांवर जनहित याचिकाही दाखल केल्या आहेत. बार काऊन्सिलच्या या निर्णयामुळे कायदेशीर क्षेत्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांमधून उमटू लागल्या आहेत तर काहींनी या शिस्तभंगाच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

…तर सामान्य नागरिकांची माफी मागेनःसरोदे

दरम्यान बार काऊन्सिलच्या या निर्णयावर असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. गेल्या २५ वर्षांपासून मी अन्यायग्रस्त लोकांना मदत करतो. लोकांसाठी मी विविध विषयांत काम केले आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केले आहे. राज्यपाल यांना मी फालतू म्हणालो म्हणून मी गैरवर्तन केले असे बार काऊन्सिलने म्हटले आहे. जर मी चुकलो असेल तर सर्वसामान्य नागरिकांची माफी मागेन, असे सरोदे यांनी म्हटले आहे.

माझ्यावर बालंट लावले आहे. ज्यांचे आपल्यावर प्रेम आहे ते ते कुठे चुकले ते सांगतात. न्यायव्यवस्थेवर प्रेम असेल, संविधानावर प्रेम असेल, न्यायव्यवस्थेत काही चुका आणि उणिवा असतील तर त्या सांगितल्या तर त्यात चुक काय? कुठली नवी व्याख्या तयार होते? असे सरोदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जनता न्यायालय हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा आमदार अपात्रतेवर मी बोललो होतो. सर्वोच्च न्यायालयाने १० व्या श्येड्यूलनुसार कोण पात्र, कोण अपात्र याबाबतचा निर्णय घ्या, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला, असेही मी बोललो होतो. न्यायव्यवस्थेत न्यायाधीश भ्रष्टचारी आहेत, असे मी म्हणालो होतो. हे चुकीचे आहे, असे कोणीही दाखवून द्यावे, असे आव्हान असीम सरोदे यांनी दिले आहे.

कोश्यारी, नार्वेकरांनीच माझ्यावर केस करावी

मी जेव्हा भगतसिंह कोश्यारी यांना फालतू म्हणालो तेव्हा ते राज्यपाल नव्हते. मी त्यांच्याविषयी चार वाक्ये म्हणालो आणि ती वाक्ये मी पुन्हा पुन्हा म्हणणार, कारण हे वास्तव आहे. फालतू हा शब्द असंसदीय आहे का? शिवी आहे का? मी राहुल नार्वेकरांची बदनामी केली असेल तर त्यांनी माझ्यावर केस करावी. तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अपमान झाला असेल तर त्यांनी माझ्यावर केस करावी, असे सरोदे म्हणाले. मी काळा कोट घालून मुलाखती देऊ शकतो, ऍड. असीम सरोदे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकतो. फक्त बँड लावून मी युक्तिवाद करू शकतो, असेही सरोदे म्हणाले.

उद्या तारीख, आज निर्णय मुद्दाम दिला का?

१२ ऑगस्ट २०२५ रोजी बार काऊन्सिलने ऑर्डर काढली. मला ती आज मिळाली. तेव्हाच निर्णय झाला तर मग ऑर्डर आज का दिली? १२ ऑगस्टनंतर मी महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलच्या कार्यालयाकडे निर्णयाबाबत विचारले होते. पण तेव्हा काहीच सांगण्यात आले नाही. तेव्हाच का सांगितले नाही? मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केस लढवतो आहे. १२ नोव्हेंबरला केस आहे. मग मुद्दाम असे केले का? असा सवालही त्यांनी केला. या निर्णयाविरुद्ध बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागणार असल्याचेही सरोदे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!