औरंगाबादः मुंबई, भिवंडी, पुणे पाठोपाठ शहरात गोवर साथीचा प्रादुर्भाव वाढण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या भानुदासनगरमधील एक वर्षाच्या बालकाचा गोवरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तीन बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
मुंबई आणि भिवंडी येथे गोवरची साथ उदभवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून काही दिवसांपासून खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिकेने संशयित २५ गोवर रुग्णांच्या रक्तांचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबई येथील हाफकीन लॅबोरेटरीत पाठविले होते. त्यापैकी पंधरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दहा जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.
तीन दिवसांपूर्वी शताब्दीनगर आणि रहेमानिया कॉलनी येथे ८ संशयितांचे रक्त नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले. गुरुवारी एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या पाठोपाठ शुक्रवारी आणखी एका बालकाच्या गोवरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रातंर्गत भानुदासनगरमधील या एक वर्षाच्या बालकाचे लसीकरण झालेले आहे. तरी देखील त्यास गोवर निघाल्याने त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन ते मुंबईच्या हाफकीन प्रयोग शाळेत पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच शहरातील तीन बालकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
अतिजोखमीच्या भागात विशेष लसीकरणः शहरात गोवर साथीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत गोवरचे संशयीत बालके आढळून आलेल्या अतिजोखमीच्या भागात विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये शम्सनगर, जहागीर कॉलनी, स्मृती उद्यान, कादरियानगर, अबरार कॉलनी, जुना बाजार, शहाबाजार, बौद्ध विहार, मिसारवाडी, विश्वभारती कॉलनी, नारेगाव, हिना नगर, सिडको, चिकलठाणा, सातारा-देवळाई, पडेगाव-मिटमिटा या भागात गोवर साथीचे संशयित बालके आढळून आल्यामुळे उद्या शनिवारपासून या भागात गोवरची विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.