छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तरूणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञान व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दरकवाडी येथील तरूण बाबासाहेब रामराव वाघ यांना मंत्री संदीपान भुमरे यांनी अज्ञात फोनवरून कॉल करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. २१ जून रोजी सकाळी १० वाजता संदीपान भुमरेंनी फोन करून आपणाला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून धमकी दिल्याची तक्रार बाबासाहेब रामराव वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि भुमरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भुमरेंनी केलेल्या शिविगाळीची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.
त्यानंतर २५ जूनच्या रात्री आपल्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बाबासाहेब वाघ या तरूणाने केला आहे. बाबासाहेब वाघ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ जूनला रात्री काही लोक काळ्या गाडीतून माझ्या घरासमोर येऊन थांबले आणि त्यांनी माझ्या घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यावर अज्ञात लोकांना पाहून मी तत्काळ ११२ नंबरला फोन लावला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले. बाबासाहेब वाघ यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब वाघ हा संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावचा तरूण आहे. गेल्या काही दिवसांपासून तो छत्रपती संभाजीनगर शहरात रहाण्यासाठी आला आहे. दरकवाडी गावात रस्त्याचे काम सुरू झाले, परंतु रस्त्याचे काम न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप बाबासाहेब वाघ या तरूणाने केला होता.
दरकवाडीतील या रस्त्याचे काम मंत्री संदीपान भुमरे यांचा मुलगा बापूसाहेब उर्फ विलास भुमरे करत असल्याचे गावातील लोकांनी बाबासाहेब वाघला सांगितल्यानंतर त्याने भुमरे यांचे स्वीय सहायक मालपाणी यांना फोन करून रस्त्याच्या कामाबद्दल विचारणा केली होती.
बाबासाहेब वाघ याने मालपाणीकडे विचारणा केल्याचा राग आल्याने भुमरे यांनी आपल्याला फोनवरून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली, तसेच तुझ्या घरी येतो, अशी धमकी दिली, अशी तक्रार या तरूणाने पोलिसांकडे केली होती. भुमरे यांच्या धमकीमुळे आपण प्रचंड दहशतीखाली असून भुमरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तरूणाने पोलिसांकडे केली होती.
बाबासाहेब वाघ या तरूणाने भुमरे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर २५ जूनच्या रात्री काळ्या गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आपल्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तरूणाने केला असून तशी तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्ती ज्या काळ्या गाडीतून आले ती गाडी कोणाची होती? बाबासाहेब वाघच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेले ते अज्ञात लोक कोण होते? याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.