डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने मिळवला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (डीपीयू) नाव व लोगो वापरून एम. फिल.ची बोगस पदवी तयार केल्याचा गौप्यस्फोट न्यूजटाऊनने केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या दोघांनी याच बोगस पदवीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी. च्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खुलताबाद येथील वादग्रस्त कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चालवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील बोगस एम.फिल.ची पदवी तयार केली. या दोघांकडे असलेल्या एम.फिल.च्या पदव्यांची सत्यासत्यता पडताळण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला  असता या विद्यापीठाने या दोघांच्याही एम. फिल. च्या पदव्या बनावट आणि खोट्या असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

आमच्याकडे मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच एम.फिल. हा अभ्यासक्रमच चालवला जात नाही, त्यामुळे या दोघांना एम.फिल.च्या गुणपत्रिका आणि पदवी जारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आस्मा खान आणि मकसूद खान हे हे आमच्या विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते आणि नाहीत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून त्यांच्याकडे असलेल्या एम.फिल.च्या पदव्या बनावट आणि खोट्या आहेत, असा लेखी खुलासाच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आय. एस. भवलकर यांनी केला आहे. हे वृत्त न्यूजटाऊनने २२ मार्च रोजी प्रसिद्ध केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता या दोघांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

हेही वाचाः कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

नोव्हेंबर २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी.च्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आस्मा खान यांनी इंग्रजी विषयातील पीएच.डी.साठी तर मकसूद खान यांनी हिंदी विषयातील पीएच.डी.साठी नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला आणि या प्रक्रियेत या दोघांनीही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे बोगस एम.फिल. पदवी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे या दोघांनाही पेट परीक्षेतून सूट देण्यात आली.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

डॉ.डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बोगस एम.फिल. पदवी प्रमाणपत्राच्या आधारे आस्मा खान आणि मकसूद खान यांना पेट परीक्षेतून सूट देण्यात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आस्मा खान यांना ४ मार्च २०२२ रोजी इंग्रजी विषयातील तात्पुरते संशोधन मंजुरी पत्र (प्रोव्हिजन रिसर्च अप्रूव्हल) दिले. त्यांचा पीआरएन २०१५३६०७१ आहे. तर मकसूद अन्वर खान यांना हिंदी विषयातील तात्पुरते संशोधन मंजुरी पत्र १० मार्च २०२२ दिले. त्याचा पीआरएन २०१५३७९९ आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मान्यता अखेर रद्द, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाची कारवाई

बोगस एमफिलच्या आधारे पीएच. डी.ला प्रवेश मिळवून या दोघांनी विद्यापीठाकडून मिळालेल्या या तात्पुरत्या संशोधन मंजुरी पत्रांच्या आधारे आतापर्यंत प्रोग्रेस रिपोर्ट, आरआरसी, डीआरसी आणि प्री-पीएचडी व्हायव्हा अशा सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. आता पुढील काही दिवसांत या दोघांनाही विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक इंग्रजी आणि हिंदी विषयातील विद्या वाचस्पती ही सर्वोच्च पदवी बहाल केली जाण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

पडताळणी करण्याची जबाबदारी कोणाची?

पीएच.डी.च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येत असलेल्या एम.फिल. किंवा नेट/सेट प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना पेटमधून डोळे झाकून सूट देण्यात येते, हे आस्मा खान आणि मकसूद खान यांनी पीएच.डी.ला मिळवलेल्या प्रवेशावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवेशुच्छूक उमेदवारांनी सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट याची पडताळणी करण्याची जबाबदारी विद्यापीठाचीच असताना अशी कोणतीच पडताळणी अथवा खातरजमा न करताच पीएच.डी.ला प्रवेश दिलेच कसे जातात? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गिळले विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या कामकाजाच्या मानधनाचेही पैसे!

नोंदणी रद्द करून ४२० चा गुन्हा दाखल करा

आस्मा खान आणि मकसूद खान या दोघांनीही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार केलेल्या बनावट आणि खोट्या एम.फिल. पदवी प्रमाणपत्राच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळवून विद्यापीठाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या दोघांचीही पीएच.डी.ची नोंदणी रद्द करून त्यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करा आणि गेल्या १० वर्षात जेवढ्या उमेदवारांनी एम.फिल.च्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेऊन पदव्या संपादन केल्या आहेत, त्या सर्वांच्याच पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी करा, अशी मागणी रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाअध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे केली आहे. आता कुलगुरू या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!