आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू; अपघाती मृत्यू आल्यास १० लाख, तर कायम अपंगत्व आल्यास मिळणार ५ लाख रुपये


मुंबई: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास ५ लाख रुपये रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित १ कोटी ५ लाख रुपये इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.

राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास १० लाख रुपये व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास ५ लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!