नवी दिल्लीः कोरोनाच्या महामारीनंतर राज्यातील शिक्षणाचा स्तर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती ढासळली आहे. पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी करता येत नाही आणि आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही, अशी धक्कादायक वस्तुस्थिती प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वास्तवच या सर्वेक्षणाने उघड केले आहे.
‘प्रथम’ने देशभर केलेल्या ‘असर’ म्हणजेच अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट नावाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांतील आवश्यक क्षमता आत्मसात केल्या आहेत का? याची पाहणी या सर्वेक्षणातून करण्यात येते.
या सर्वेक्षणातून महाराष्ट्रातील शिक्षणाचे भीषण वास्तव समोर आले आहे. पाचवीतील ४४ टक्के तर आठव्या वर्गातील २४ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तराचे मराठी वाचनही येत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणात इयत्ता दुसरीच्या स्तरावरील दहा ते बारा साध्या-सोप्या वाक्यांचा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला. ‘एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले….’ हा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला. परंतु पाचवीतील ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी हा परिच्छेद वाचू शकले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे इयत्ता आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करण्यास सांगण्यात आले. ही वजाबाकी फक्त १९.६ टक्के विद्यार्थीच करू शकले. ८०.४ टक्के विद्यार्थ्यांना हे गणित सोडवता आले नाही.
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. हे गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ ३४.६ टक्के आहे. ६५.४ टक्के विद्यार्थ्यांना हे गणित सोडवता आले नाही.
कोरोना काळात शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर विपरित परिणाम झाल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते. किमान क्षमता विकास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे. समाधानाची बाब म्हणजे देशपातळीवर शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण घटले आहे.
६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. १५ ते १६ वयोगटातील १.५ टक्के मुले शाळाबाह्य आहेत. ग्रामीण भागातील शाळांमधील पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली असल्याचे हा अहवाल सांगतो.
देशभरातील ६१६ जिल्ह्यातील १९ हजार खेड्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात तब्बल ७ लाख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रथमच्या वतीने दरवर्षी हे सर्वेक्षण करण्यात येते. कोरोना काळात या सर्वेक्षणात खंड पडला होता.