मुंबई: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी १ कोटी ७० लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
विमा योजनेत समाविष्ट पिके भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.
ई-पीक पाहणी
शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद यांच्या जमीनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडलमधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन येणाऱ्या उत्पादनानुसार महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा, पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात.
आधार कार्ड व बँक खात्यावरील नाव सारखे
आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे, विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.
कशासाठी विमा संरक्षण?
पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान.
सहभागासाठी काय करावे?
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसदेखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे.
विमा संरक्षित रकमेत जिल्हानिहाय फरक
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु.४०००० ते ५१७६०, ज्वारी रु.२०००० ते ३२५००, बाजरी रु १८,००० ते ३३,९१३, नाचणी रु. १३७५० ते २००००, मका रु ६००० ते ३५५९८, तूर रु २५००० ते ३६८०२, मुग २०००० ते २५८१७, उडीद रु. २०००० ते २६०२५, भुईमुग रु. २९००० ते ४२९७१, सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७, तीळ रु. २२००० ते २५०००, कारळे रु. १३७५०, कापूस रु. २३००० ते ५९९८३, कांदा रु. ४६००० ते ८१४२२.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.