पडद्यामागे चाललंय काय?: लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे २३ आमदार शरद पवारांकडे परतणार, आ. रोहित पवारांचा दावा


मुंबईः आगामी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ आमदार पुन्हा शरद पवारांकडे परततील, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठ्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट संकेतच मिळाले आहेत.

जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्वात एक मोठा गट फुटून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. परंतु अजित पवार यांच्यासोबत जे आमदार गेले आहेत, ते तेथे सुखी नसल्याचेच संकेत मिळत आहेत. या आमदारांबाबत आ. रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ ते २३ आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परततील, असा मोठा दावा आ. रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल, हे जनताच ठरवेल. अमित शाह, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात यावे लागते, कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता पवारांच्या आणि विचारांच्या पाठिशी राहील, असा विश्वासही आ. रोहित पवार यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवला आहे.

निवडणुकीबाबत वेगवेगळे सर्वे असतात. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३० जागा मिळतील. १८ ते २० जागा महायुतीला मिळतील, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.

बंद खोलीत अमित शाह म्हणतील आमचे ऐकावे लागेल. अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १० जागा मिळतील. अमित शाहांचे त्यांना ऐकावेच लागेल. परंतु अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्यांनाच मान्य असेल असे नाही, असेही रोहित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!