नवी दिल्लीः आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून आपली उत्पादने बनवत असल्याचा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीच्या ‘दिव्य दंतमंजन’ या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पतंजली या उत्पादनावर हिरवे लेबल लावते. हिरवे लेबल लावण्याचा अर्थ हे उत्पादन पूर्णतः शाकाहारी असल्याचा दावा असतो. म्हणजेच पतंजली कंपनी आपले हे उत्पादन शाकाहारी असल्याचा दावा करत ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असून याबाबत पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे.
नवी दिल्लीच्या वकील शाशा जैन यांनी पतंजलीला दिव्य दंतमंजन या शाकाहारी उत्पादनात मांसाहारी पदार्थाचा वापर केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली आहे. पतंजली आपल्या उत्पादनामध्ये शाकाहारी घटकांचा वापर करत असल्याचा दावा करते. परंतु पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या टूथपेस्टमध्ये सीफेन (कटलफिश) वापरण्यात आले आहे. सीफेन किंवा कटलफिश हा मांसाहारी पदार्थ आहे, असे शाशा जैन यांनी म्हटले आहे.
पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या हिरवे लेबल लावलेल्या म्हणजेच हे उत्पादन पूर्णतः शाकाहारी असल्याचा दावा केलेल्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक पदार्थाचा वापर करणे हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. ते आमच्या समुदायासाठी आणि इतर शाकाहारी समुदायांसाठीही अत्यंत अपमानजनक आहे. त्यामुळे मी पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे, असेही शाशा जैन यांनी म्हटले आहे.
शाशा जैन यांनी ही कायदेशीर नोटीस ट्विटवर शेअर केली आहे. पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि त्यांचे उत्पादन दिव्य दंतमंजनमध्ये सीफेनच्या वापराबद्दल उत्तर मागितले आहे. पतंजली हे उत्पादन हिरवे लेबल लावून विकते. ही ग्राहकांची दिशाभूल असून पतंजली आपली उत्पादने वापरणाऱ्या मोठ्या संख्येने असलेल्या शाकाहारी ग्राहकांच्या भवानांशी खेळत आहे, असे शाशा जैन यांनी म्हटले आहे.
माझे कुटुंब, नातेवाईक, सहकारी आणि मित्र सर्वजण या उत्पादनाचा वापर करतात. मात्र पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर आमच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे, असे जैन यांनी म्हटले आहे.
शाशा जैन यांनी पतंजलीला ११ मे रोजी ही कायदेशीर नोटीस पाठवली असून १५ दिवसांत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. कंपनीने १५ दिवसांत उत्तर दिले नाही तर कंपनीविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.
काय असते सीफेन?
समुद्रात आढळणारा कटलफिश हा मासा जेव्हा मरतो तेव्हा त्याची हाडे पाण्यात विरघळतात आणि पृष्ठभागावार तरंगू लागतात. जेव्हा जास्त कटलफिशची हाडे समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगू लागतात तेव्हा ते फेस किंवा फेनसारखी दिसतात. त्यामुळे त्याला सीफेन म्हणतात. मच्छिमार हा सीफेन गोळा करून वाळवून विकतात. याचा वापर औषधांमध्ये केला जातो. पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या टूथपेस्टमध्ये हाच सीफेन वापरण्यात येत असल्याचा आरोप आहे.