मायावतींचा राजकीय उत्तराधिकारी ठरला, भाचा आकाश आनंद यांच्याकडे असतील भविष्यात बसपची सूत्रे!


लखनऊः २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाची (बसप) सूत्रे मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांच्याकडे असतील. खुद्द मायावती यांनीच रविवारी ही घोषणा केली. म्हणजेच आकाश आनंद हे मायावती यांचे राजकीय उत्तराधिकारी असतील!

खासदार दानिश अली यांना बसप प्रमुख मायावती यांनी कालच बाहेचा रस्ता दाखवल्यानंतर आज रविवारी बसपची संघटनात्मक बैठक घेण्यात आली. या बैठकीत बसप प्रमुख मायावती यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी जाहीर केला. भाचा आकाश आनंद यांच्याकडे भविष्यात बसपची सूत्रे असतील, असे मायावती यांनी घोषित केले.

बसप प्रमुख मायावती यांनी आकाश आनंद यांना आपला राजकीय उत्तराधिकारी निवडले आहे. त्यांच्यावरे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या बाहेर अन्य राज्यांत पक्ष भक्कम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे या बैठकीला उपस्थित असलेल्या बसप नेत्यांनी सांगितले. या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी करून बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

आकाश आनंद हे मायावती यांचे छोटे भाऊ आनंद कुमार यांचे चिरंजीव आहेत. मायावती यांच्यानंतर आकाश आनंद हेच बपसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील, अशी अटकळ आधीच घातली जात होती. मागील वर्षांपासून हे पक्षाचे प्रभारीही होते.

आकाश आनंद हे २०१६ मध्ये बसपमध्ये सहभागी झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना स्टार प्रचारक म्हणून समोर आणण्यात आले. मायवती यांनी २०१९ मध्ये त्यांचे भाऊ आनंद कुमार यांची बसपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती आणि भाचा आकाश आनंद यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवली होती.

आकाश आनंद यांनी २०२२ मध्ये राजस्थानच्या अलवरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ किलोमीटरची स्वाभिमान संकल्प पदयात्रा काढली होती. तेव्हापासून ते मायावतीच्या विश्वासू नेत्यांमध्ये दिसत होते. २८ वर्षीय आकाश आनंद यांनी लंडनमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

आकाश आनंद यांनी नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत विशेषतः मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीत आपली वोट बँक कायम ठेवण्यात बसपला बऱ्याच अंशी यश आले आहे. राजस्थानमध्ये दोन जागाही जिंकल्या आहेत.

घराणेशाहीच्या राजकारणावर सातत्याने टीका करणाऱ्या मायावतींसाठी आकाश आनंद यांच्याबाबतीत निर्णय घेणे सोपे काम नव्हते. त्याचा अंदाज त्यांना २०१९ मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जे चित्र निर्माण केले गेले होते, त्यावरून आला होता.

२०१९ मध्ये मायावती यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत दिसणारा एक तरूण अचानक राष्ट्रीय मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्या बाबत झालेल्या तमाम चर्चांना बसप प्रमुख मायावती यांनी तेव्हाच उत्तर दिले होते. तो तरूण आपला भाचा आकाश आनंद आहे आणि बसपच्या चळवळीत त्याला त्या सहभागी करून घेत आहेत. तेव्हा आकाश केवळ २४ वर्षांचे होते.

मी कांशीराम यांची शिष्य आहे आणि जश्याच तसे उत्तर देणे मला चांगले जमते. मी आकाशला बसपच्या चळवळीत सामील करून घेईन. जर मीडियातील काही जातीयवादी आणि दलितविरोधी गटांना त्यावर आक्षेप असेल तर असू दे. आमच्या पक्षाला त्याची अजिबात चिंता नाही, असे मायावती तेव्हा म्हणाल्या होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!