छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भुजबळ सुमारे पाऊणतासापासून वेटिंगवर होते. त्यानंतर पवारांनी त्यांना भेट दिली. भेटीतील चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.

बारामतीत रविवारी (१४ जुलै) झालेल्या सभेत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली होती. आरक्षणाच्या आडून शरद पवार महाराष्ट्र पेटवण्याचे काम करत असल्याचे भुजबळ म्हणाले होते. या भाषणाला २४ तासही उलटले नाही तोच भुजबळ शरद पवारांच्या भेटीला पोहोचले पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या शरद पवारांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. आज त्यांनी दोनच जणांना भेटीसाठी वेळ दिली. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकरांचा समावेश आहे. पवार-नार्वेकर यांच्यात काहीवेळ चर्चा झाली आणि नंतर ते सिल्व्हर ओकबाहेर पडले. 

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला अचानक पोहोचले. त्यांनी भेटीसाठी पवारांची वेळ घेतलेली नव्हती. त्यामुळे पवारांनी भुजबळांना बाहेरच थांबण्यास सांगितले.  सुमारे पाऊण तासापेक्षा जास्तवेळ भुजबळ वेटिंगवर राहिल्यानंतर पवारांनी भुजबळांना भेट दिली.

शरद पवार आणि भुजबळ यांच्यात झालेल्या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. भुजबळ आणि पवारांत सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर भुजबळ सिल्व्हर ओकबाहेर पडले. सिल्व्हर ओकबाहेर पडल्यानंतर माध्यमांनी भुजबळांना गाठले. बंगल्यावर जाऊन सविस्तर सांगतो, एवढेच बोलून भुजबळ रवाना झाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!