कोलकाताः एका ज्येष्ठ महिला प्राध्यापिकेने प्रथम वर्षाला शिकणाऱ्या आपल्याच विद्यार्थ्यासोबत भरवर्गातच ‘विधीवत’ लग्न केले. बंगाली पद्धतीने झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आणि नव्या वादाला तोंड फुटले. अनेकांनी या प्राध्यापिकेवर टिकेची झोड उठवली. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हरिंगहाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात (एमएकेएयूटी) घडली. या घटनेनंतर विद्यापीठाने त्या महिला प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवले असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
प्रा. पायल बॅनर्जी या एमएकेएयूटीच्या हरिंगहाटा येथील तंत्रज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात ज्येष्ठ प्राध्यापिका आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत वर्गात प्रा. पायल बॅनर्जी या नव्या नवरीसारख्या सजून धजून दिसत आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याशी त्या वर्गातच हिंदू बंगाली विवाहाच्या प्रथेनुसार ‘सिंदूर दान’ आणि ‘माला बदल’ (जयमाला) यासारखे रितीरिवाज निभावताना दिसत आहेत.
विद्यापीठाच्या लेटरहेडवर ही प्राध्यापिका आणि त्या विद्यार्थ्याची स्वाक्षरी असलेले एक पत्रही व्हायरल झाले आहे. आम्ही एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करत असल्याचे या पत्रात नमूद करून दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यावर दोन्ही बाजूंनी तीन-तीन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. पारंपरिक बंगाली पद्धतीने पार पडलेल्या या विवाहाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
प्रा. पायल बॅनर्जी यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा एक ‘सायको-ड्रामा’ होता आणि अभ्याक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगण्यासाठी हा नकली विवाह करण्यात आला, असे प्रा. पायल बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
या ‘सायको-ड्रामा’मध्ये विद्यार्थ्यांनी मलाच मुख्य भूमिका निभावण्याची विनंती केली. मी ती मान्य केली. महाविद्यालयाच्या अन्य सदस्यांना याबाबत माहिती होती. त्यांनी या कार्यक्रमाला सहमतीही दिली होती. तेव्हा यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. माझा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आणि मी स्क्रिप्टनुसारच काम केले. त्यामध्ये गंभीर असे काहीही नव्हते, असे प्रा. पायल बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
हे काही खरेखुरे लग्न नव्हते. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. काही लोकांनी माझ्याविरोधात या व्हिडीओचा वापर केला. तो कुणी व्हायरल केला, हे मला माहित आहे. त्या व्यक्तीच्या विरोदात माझ्याकडे बऱ्याचशा तक्रारी आल्या होत्या, असेही प्रा. पायल बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि टिकेची झोड उठल्यानंतर विद्यापीठाने या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आणि प्रा. पायल बॅनर्जी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रा. बॅनर्जी सक्तीच्या रजेवर राहणार आहेत. उचित चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणतीही कठोर कारवाई करू शकत नाही, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या चौकशी समितीत अन्य विभागाच्या तीन महिला प्राध्यापिकांचा समावेश आहे. हा विवाह आणि व्हिडीओ माझ्या विषयाच्या अभ्यासाचाच एक भाग होता. बाहेर प्रसार करण्यासाठी हा व्हिडीओ नव्हता असे प्राध्यापिकेने स्पष्ट केले आहे, असे एमएकेएयूटीचे प्रभारी कुलगुरू तापस चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. पहा व्हिडीओः