
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरूवारी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला.या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत होते.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्या. प्रसन्न बी. वराळे, न्या. ए.एस. चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्या. नितीन सामरे, न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी, भारताचे महाअधिवक्ता अनिल सिंग, राज्याचे अभियोक्ता अमरजित सिंग गिरासे, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई याही यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी वकील संघाच्या वतीने न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी विधिज्ञ साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरणही न्या. गवई यांच्या हस्ते करण्यात आले.
वडिलांच्या आग्रहाखातर मी वकील व नंतर न्यायाधीश झालो. लोकांना सामाजिक आर्थिक समता देणारा न्याय देण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाच्या सुत्रानुसार न्यायदानाचे काम मी करीत असतो. न्यायदान ही एक नोकरी नसून ती आपल्या हातून होत असलेली देशसेवा आहे, असे न्या. गवई म्हणाले.
औरंगाबाद खंडपीठात काम करतांना व येथील वास्तव्यातील अनेक आठवणीत न्या. गवई रमले होते. न्यायाधीश म्हणून काम करतांना आपण घेतलेल्या शपथेशी एकरुप होऊन आणि संविधानाची मूल्ये जपून आपण न्यायदानाचे काम करु, असेही त्यांनी सांगितले.
एक चांगला न्यायाधीश वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा. त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन होते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते. खुर्ची येते व जाते. प्रेम मात्र कायम राहते. मी गेलो तेथे मित्र जोडत गेलो, असेही न्या. गवई म्हणाले.
