नवी दिल्लीः भाजपने रविवारी आंबेडकर जयंतीच्या दिवशी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘मोदीची गॅरंटी’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात १४ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. वन नेशन-वन इलेक्शनची अंमलबजावणी आणि पुढील पाच वर्षे मोफत रेशनचाही त्यात समावेश आहे. दरम्यान, असून भाजपचा जाहीरनामा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द गायब असून भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे जुमलापत्र असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. गरीब, युवा, अन्नदाता (शेतकरी) आणि नारी (महिला) यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. भारताला समृद्ध राष्ट्र बनवणे आणि आंतरराष्ट्रीय संबंध भक्कम करण्यावरही त्यात भर देण्यात आला आहे.
जाहीरनाम्यातील ठळक घोषणा
- एक देश, एक निवडणूक आणि सर्वसाधारण मतदार यादीची अंमलबजावणी करणार.
- गरिबांसाठी मोफत रेशन, पाणी आणि गॅस कनेक्शन.
- समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करणार.
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत शून्य वीज बिल, ३ कोटी लखपती दीदी.
- वंदे भारत रेल्वे नेटवर्कचा विस्तार, वेटिंग लिस्ट संपुष्टात आणणार. अमृत भारत आणि नमो भारत रेल्वे चालवणार.नवीन विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो आणि जलमेट्रो सुरू करणार.
- जगभरात रामायण उत्सव साजरा करणार.
- अयोध्यामध्ये पर्यनाशी संबंधित सुविधांचा विस्तार करणार.
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व प्राप्त करण्यावर विशेष भर देणार.
- महिलांसाठीच्या शौचालयांच्या संख्येत वाढ करणार आणि महिला शक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी करणार.
- ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणणार.
- गरिबांसाठी तीन कोटी मोफत घरे बांधणार.
- गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.
- पीएम किसान योजनेचा लाभ दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
- सहकारातन समृद्धीच्या दृष्टीने भाजप राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
- मुद्रा योजनेअंतर्गत १० लाखांऐवजी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. भाजपचा हा जाहीरनामा जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाची गुणत्ता आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगारावर केंद्रीत आहे. गरिबांसाठी पुढील पाच वर्षे मोफत धान्य योजना सुरू राहील. लोकांना जनऔषधी केंद्रामार्फत ८० टक्के औषधे मिळत राहतील, शिवाय या केंद्रांचा विस्तार केला जाईल. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत राहतील, असेही मोदी म्हणाले.
जाहीरनाम्यातून महागाई, बेरोजगारी गायब
भाजपच्या या जाहीरनाम्यावर विरोधकांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्यांवर भाजप चर्चाही करत नाही. भाजपचा जाहीरनामा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द गायब आहेत. या उलट आमची योजना स्पष्ट आहे. सरकार आल्यानंतर ३० लाख नोकरभरती करायची आणि प्रत्येक शिक्षित तरूणाला कायमची नोकरी प्रदान करायची, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भाजपचा हा जाहीरनामा नव्हे तर जुमलापत्र आहे. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी १ तास ४० मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात पत्रकारांना एकही प्रश्न विचारू देण्यात आला नाही, असे पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.
हे तर ‘संविधान बदलो’पत्र
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे एक ढोंग असून या जाहीरनाम्याला खरे तर संविधान बदलो पत्र म्हटले पाहिजे, असे प्रियंका गांधी- वाड्रा यांनी म्हटले आहे.
लक्षात ठेवा भाजपने सुरूवातीपासूनच देश, समाज आणि लोकशाही विरोधात षडयंत्र रचले आहे. भाजपचे नेते आधी तुमच्यासमोर येतील, संविधानाची शपथ घेतील आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारात संविधान नष्ट करण्याची पटकथा रचतील. जर त्यांना पुन्हा सत्ता मिळाली तर संविधान सुरक्षित राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान या देशाचा आत्मा आहे. हा आत्मा जपण्यासाठी विरोधी पक्ष एकजुटीने भाजपचा पराभव करण्यासाठी तयार आहे, असेही प्रियंका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे.
या जुमलापत्रावर कोणाचाही विश्वास नाही
आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी सिंह यांनीही भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे जुमलापत्र असल्याचे म्हटले आहे. आज देशात बेरोजगारीची मोठी समस्या असून लोक चिंतेत आहेत. एलपीजी सिलिंडरचा दर ३०० रुपयांवरून १२०० रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर ५५ रुपयांवरून ९० रुपयांवर गेला आहे. घर खर्च चालवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची होरपळ होत आहे. त्यामुळे भाजपच्या जुमलापत्रावर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही, असे आतिशी यांनी म्हटले आहे.