भंडाराः काँग्रेसचा जाहीरनामा ही खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, शेती जीएसटीमुक्त केली जाईल, अग्नीवीर योजनेवर बंदी आणली जाईल आणि मोदी सरकारने चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या जीएसटीमध्ये बदल करून देशात एकच करप्रणाली लागू केली जाईल आणि देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये दिले जातील, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले.
विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे भव्य जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. या सभेला इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे पाच मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करून तयार केला आहे. बंद खोलीत बसून नव्हे तर देशातील लाखो लोकांना भेटून हा जाहीरनामा बनवला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मागच्या निवडणुकीच्या प्रचारात बेरोजगारीचा मुद्दा मांडायचे आणि म्हणायचे की देशातील दोन कोटी तरूणांना रोजगार देऊ. परंतु त्यांनी काहीच केले नाही. उलट त्यांनी नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. अग्नीवीर योजना आणली. या सगळ्यामुळे देशात होते तेवढे रोजगारही बंद झाले. त्यामुळे दोन गोष्टी मी आधीच स्पष्ट करतो. यांची जी अग्नीवीर योजना आहे, ती आम्ही आमचे सरकार आल्यास पहिल्याच दिवशी बंद करू, असे राहुल गांधी म्हणाले.
मोदींनी देशात चुकीचा जीएसटी लागू केला. या जीएसटीमुळे देशातील छोटे व्यापारी संपले. लहान आणि मध्यम उद्योगधंदे बंद पडले. पाच वेगवेगळे कर, दलाली खाणारा आणि खंडणी गोळा करणारा जीएसटी आम्ही बदलणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यावर देशात एकच करप्रणाली असेल आणि जनतेकडून कमीत कमी कर गोळा केला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
जिसकी जितनी आबादी, उसकी उतनी भागीदारी
एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी समाजाची सरकारमध्ये अत्यल्प भागीदारी आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे. यासाठी काँग्रेस सत्तेत येताच जातनिहाय जनगणना, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारक काम करणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदींकडून २४ तास एका समाजाला दुसऱ्याविरोधात लढवण्याचे काम
नरेंद्र मोदी २२४ तास धर्म, हिंदू-मुस्लिम यावरच बोलतात. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात लढवतात व तुमची संपत्ती अदानींच्या घशात घालतात. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने जनतेला लुटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, गरीब, आदिवासी यंच्यासाठी काय केले?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
देशात सर्वात मोठा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. पण मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते. पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळात जातात व पूजा करतात. मोदींनी देशाची थट्टा चालवली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.