परभणीः मला उपरा आणि परका म्हणू नको. बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहेस. माझ्या नादाला लागू नको. फार अवघड होईल तुझे, अशा शब्दांत महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना धमकी दिली आहे.
महादेव जानकर यांनी आज पूर्णा तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रचार केला आणि ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर इत्यादी महायुतीचे पदाधिकारी होते. यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना थेट धमकीच देऊन टाकली.
मी हिंद केसरीबरोबर लढाई लढली आहे. शरद पवार, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो आहे. नांदेड, सांगली, माढा, बारामतीत निवडणुकीला उभा राहिलो आहे आणि आता गुलाल लावून घ्यायला परभणीला आलो आहे. मी कांशीराम यांच्यासोबत सात वर्षे फिरलो आहे. व्ही.पी. सिंग, अर्जुन सिंग यांच्यासोबत मी फिरलो आहे. मला उपरा आणि परका म्हणू नका. बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहेस. माझ्या नादाला लागू नकोस, फार अवघड होईल तुझे, अशी धमकीच जानकरांना देऊन टाकली.
विरोधक आता मराठा आणि ओबीसीचा मुद्दा काढतील. पण सांगेन की परभणी लोकसभा मतदारसंघातील ७० टक्के मराठा समाजाची मते मीच घेणार आहे. विरोधक मला बाहेरचा, उपरा म्हमतात. पण बंडू जाधव तुम्ही पण लातूर जिल्ह्यातले, अहमदपूरचे आहात. माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार अहमदपूरमधून निवडून आलेला आहे. चार जूनला मी निवडून आल्यानंतर गावोगावी विजयाचा फेटा बांधून घ्यायला येईन. येताना सोबत जिल्ह्याचा कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक घेऊन येईन. गावातील जे प्रश्न आहेत, ते गावातच त्याच ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असे जानकर म्हणाले.
मी मतदारसंघ आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी २४ तास काम करणारा माणूस आहे. संजय जाधव यांना इंग्रजीच येत नाही. त्यामुळे ते सभागृहात थांबत नाहीत. आई देखील मुलगा रडल्याशिवाय दूध पाजत नाही. पण संजय जाधव यांची सभागृहातील उपस्थिती केवळ २५ टक्के आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही, असेही जानकर म्हणाले.