जयपूरः सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेला भर न्यायालयात कपडे उतरवायला सांगणाऱ्या न्यायमूर्तीविरोधात राजस्थान पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. जखमा दाखवण्यासाठी या न्यायमूर्तीने भर कोर्टात सामूहिक बलात्कार पीडितेला कपडे उतरवायला सांगितल्याचा आरोप आहे.
राजस्थानच्या सामूहिक बलात्कार पीडित दलित महिला तिचा जबाब नोंदवण्यासाठी ३० मार्च रोजी हिंदौनचे शहर न्यायदंडाधिकारी रविंद्र कुमार यांच्या न्यायालयात गेली होती. तुला झालेल्या जखमा पाहू दे म्हणत न्या. रविंद्र कुमार यांनी भर कोर्टातच कपडे उतरवायला सांगितल्याचा आरोप या सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेने केला आहे.
न्यायदंडाधिकाऱ्याने मला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. मी माझा पूर्ण जबाब नोंदवला. जबाब नोंदवून मी बाहेर येऊ लागले. तेव्हा न्या. रविंद्र कुमार यांनी मला परत बोलावले आणि त्यांनी मला माझे कपडे उतरवायला सांगितले. मी माझे कपडे का काढू? असे मी न्या. रविंद्र कुमार यांना विचारले. तेव्हा तुझ्या शरीरावर झालेल्या जखमा मला बघायच्या आहेत, असे न्या. रविंद्र कुमार म्हणाल्याचे या सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेने म्हटले आहे.
न्या. रविंद्र कुमार यांच्या समोर मी कपडे काढण्यास नकार दिला. महिला न्यायमूर्ती असती तर मी कपडे काढून माझ्या जखमा त्यांना दाखवल्या असत्या, असे या बलात्कार पीडितेने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून न्या. रविंद्र कुमार यांच्या विरोधात राजस्थान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३४ आणि अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.