मुंबईः शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार ठरवताना भाजपकडून थेट हस्तक्षेप करण्यात येत असून मतदारसंघातील सर्वेक्षणांचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या खासदारांची तिकिटे कापण्याची खेळी भाजपकडून खेळली जात आहे. भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हतबल झाले असून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. तिकडे यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचेही तिकिट कापण्यात आले आहे. आता हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना तर यवतमाळ-वाशिममधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी आता बंडाच्या तयारीत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर शिंदेसोबत आलेल्या १३ खासदारांची तिकिटे वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंना भाजपशी कमालीची झुंज द्यावी लागत आहे. मतदारसंघाच्या सर्वेक्षणांचे हवाले देत शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याची खेळी भाजप खेळत आहे.
भाजपने टाकलेल्या दबावामुळे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की बुधवारी मुख्यमंत्र्यांवर ओढवली. आता बाबुराव कदम कोहळीकर यांना थेट एबी फॉर्म दिला जाणार आहे. यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच हेमंत पाटील हे त्यांच्या सोबत राहिले आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यास भाजपकडून तीव्र विरोध होता. पाटील यांच्या ऐवजी नवीन उमेदवार द्या किंवा हिंगोलीची जागा आम्हाला द्या, असा आग्रह भाजपने सुरूवातीपासूनच धरला होता. तरीही शिवसेनेच्या शिंदे गटाने हेमंत पाटलांना हिंगोलीतून पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत पाटील यांनी हिंगोलीतून प्रचारही सुरू केला असतानाच भाजपने त्यांची उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणखी दबाव वाढवला. त्यामुळे बुधवारी अचानक हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करणयात आली.
यवतमाळ-वाशिमच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचीही उमेदवारी कापण्यात आली असून त्यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
भावना गवळी यांच्याबद्दलची नाराजी, त्यांच्यावर झालेले गैरव्यवहाराचे आरोप आणि ईडीकडून करण्यात आलेली चौकशी या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत भाजपने त्यांचे तिकिट कापण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला होता. त्यामुळे गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजते. भावना गवळी या सलग पाच टर्म यवतमाळ-वाशिमच्या खासदार राहिल्या आहेत.
आतापर्यत शिंदे गटातील तीन खासदारांची तिकिटे कापण्यात आली असून नाशिकच्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबद्दलही अनिश्चितता आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचे हवाले देत हिंगोली, यवतमाळ, नाशिक आणि हातकणंगले येथील शिवसेनेचे उमेदवार बदलण्याचा हट्ट भाजपने धरला. तो डावलून मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली खरी, परंतु निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येऊ लागल्याने अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या दबावापुढे झुकावेच लागले.
भावना गवळी अर्ज दाखल करणारच
भाजपच्या दबावामुळे भावना गवळी यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी नाकारण्यात आली असली तरीही गवळी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत. सर्वेक्षणाचे निकाल काहीही असो, मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ-वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा निवडून येऊ शकते. मी मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
मी आता माझ्या मतदारसंघात परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे भावना गवळी यांनी सांगितल्यामुळे त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
यापेक्षा मोठी नामुष्की कोणती?
हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टिकास्त्र सोडले आहे. मातोश्रीवर सन्मान मिळत होता, तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.