मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आणि २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आमची भूमिका जाहीर करू, अशी डेडलाईनही त्यांनी मविआला दिली. शिवसेनेसोबत वंचितची युती संपुष्टात आल्याची घोषणाही त्यांनी केली.
महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला चार जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. महाविकास आघाडीने २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावे. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार्चला मी अकोल्यातून निवडणूक अर्ज दाखल करणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची आम्ही दिलेली ऑफर कायम आहे. काँग्रेसने आम्हाला सात जागांची यादी द्यावी. आमच्या मुळे मदत होईल, काँग्रेस उमेदवार निवडून येतील, अशा सात जागांची माहिती काँग्रेसने आम्हाला द्यावी. आम्ही निश्चितपणे त्यांना मदत करू, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवरून गोंधळ आहे. काही ठिकाणी ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आमच्यामुळे तरी महाविकास आघाडीत कोणताही गोंधळ नाही. जागावाटपात आमच्यामुळे कोणतीही बाधा आलेली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
त्यांचा आणि आमचाही निर्णय झालेला नाही!
महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात त्यांचाही आणि आमचाही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत अजूनही काही जागांसंदर्भात मतभेद आहेत. त्यातच काँग्रेसने त्यांच्या काही जागांची यादी जाहीर केली आहे. मात्र मतभेद असलेल्या मतदारसंघात त्यांनी उमेदवार जाहीर केले नाहीत. यामध्ये काही मतदारसंघांवर ठाकरे गटाने दावा केला तर काही मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे एकदा त्यांचा निर्णय झाला की, आमच्याबरोबर चर्चा करायला ते तयारक असतील तर आम्ही तयार आहोत. अन्यथा इतर संघटनांशी आम्ही बोलून पुढची काय ती योजना आखणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘वंचित’ला नेमक्या किती जागांचा प्रस्ताव?
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. त्याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी त्यांना (ठाकरे गटाला) त्या चार जागा परत देतो. त्यांनी त्या लढवाव्या. संजय राऊत हे चार जागा म्हणत असले तरी त्यांनी बैठकीला गेल्यानंतर एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा अशा तीन जागा देण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यामुळे खोटे बोलणे थांबले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.
शिवसेनेसोबतची युती दीडवर्षातच संपुष्टात
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असलेली युतीही तोडली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत तसे जाहीरपणे सांगितले. वंचित आणि शिवसेना यांच्यात सुमारे दीडवर्षापूर्वी युती झाली होती. ही युती संपुष्टात आल्याची एकतर्फी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
गोंधळ त्यांचा, खापर मात्र आमच्यावर
मविआत १५ जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेले नाही. काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालत आहे. तशा प्रकारचा गोंधळ आम्ही अद्याप घातलेला नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की, तुमच्यातील १५ जागांचा वाद मिटवा. परंतु आम्हीच त्यांना साथ देत नाही, असे चित्र निर्माण केले जात आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
संविधान बदलण्यासाठीच भाजपला हव्यात ४०० जागा
संविधान बदलण्यासाठीच ४०० जागा गरजेच्या असतात. सरकार चालवण्यासाठी ३०० जागा देखील पुरेशा असतात. भाजप संविधान बदलण्यासाठीच ४०० पारचा नारा देत आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या मनसुब्यांवर टिकास्त्र सोडले. काय बदलायचे आणि काय बदलायचे नाही, हे सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे. पण मला १९५० मध्ये आरएसएसने घेतलेली शपथ आजही आठवते. आम्हाला संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू, अशी शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली होती. त्याचे रेकॉर्डही उपलब्ध आहे, असेही आंबेडकर म्हणाले.